MLC Election Result 2024 : शेकापच्या जयंत पाटील यांनी मविआमधील ‘या’ पक्षावर फोडलं पराभवाच खापर
MLC Election Result 2024 : काल विधान परिषद निवडणूक पार पडली. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. त्यात महायुतीने सर्वच्या सर्व 9 उमेदवार निवडून आणले. पण मविआचा एक उमेदवार पडला. कारण महाविकास आघाडीची मत फुटली. शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्यांनी, मतांची जुळवा जुळव कुठे चुकली? कशामुळे पराभव झाला? त्यावर भाष्य केलं.
महाराष्ट्रात काल विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. त्यात महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवार निवडून आले. फक्त जयंत पाटील यांच्या रुपाने महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडला. मविआकडून ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव निवडून आल्या. पण शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हरले. “मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला. पराभव पराभव आहे. आत्मचिंतन करतोय. सेंट्रल कमिटीची बैठक सुरु आहे. विजय झाला तरी आत्मचिंतन करतो, पराभूत झालो तरी आत्मचिंतन करतो. हरलो असलो, तरी पुन्हा लढू. महाराष्ट्रात याआधी अशा पद्धतीच राजकारण नव्हतं. थोड्या प्रमाणात इकडे तिकडे लोक करायचे. आजपर्यंत ज्या निवडणुका मी लढवल्या, तेव्हा अशी परिस्थिती नव्हती” असं जयंत पाटील म्हणाले.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांना तुम्ही मदत केली. पण तुम्हाला गरज होती, तेव्हा त्यांनी मदत केली नाही का? असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, “मी राष्ट्रवादीच्या 12 मतांवर उभा होतो. एक मत त्यांचं फुटलं. आमची पण मत फुटली. मला चार मत मिळाली असती, तर सेकंड प्रेफरन्सची 25 ते 30 मित घेऊन निवडून आलो असतो. तेच गणित होतं” “काँग्रेसने सेकंड प्रेफरन्सची मत समान वाटली पाहिजे होती, तर निकाल बरोबर लागला असता. पण त्यांनी ठाकरे गटाला प्राधान्य दिलं” असं जयंत पाटील म्हणाले. अप्रत्यक्षपणे त्यांनी कमी मत मिळाल्याचा ठपका काँग्रेसवर ठेवला.
पवार गटातील एक मत फुटलं
विधान परिषदत निवडणुकीत विजयी उमेदवारासाठी 23 मतांचा कोटा ठरवण्यात आला होता. त्यात शरद पवार यांच्याकडे 12 मत होती. जयंत पाटील यांचं स्वत:च एक मत होतं. पण जयंत पाटील यांना मिळणारं पवार गटातील एक मत फुटलं.
जयंत पाटील मविआ सोबतच राहणार का?
“मला अभ्यास, आत्मचिंतनाची गरज आहे. मी आज जास्त बोलणार नाही. दोन-चार दिवसात बोलेन. राष्ट्रवादीच एक मत फुटलं, 11 मत बरोबर मिळाली. मी महाविकास आघाडी, शरद पवारांसोबत आहे. त्यात कुठेही बदल होणार नाही” असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसची सात मत फुटली या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘मी त्याचा अभ्यास केलेला नाही’