‘मातोश्री’च्या पायऱ्यांवरून परत गेलेले भास्कर जाधव 15 वर्षांनी पुन्हा ‘मातोश्री’वर
राष्ट्रवादीचे (NCP) माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवबंधन बांधत त्यांना पक्षप्रवेश दिला.
मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवबंधन बांधत त्यांना पक्षप्रवेश दिला. यावेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut), पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. भास्कर जाधव यांचे शेकडो कार्यकर्तेही मातोश्रीवर हजर होते. भास्कर जाधव यांच्या ‘घरवापसी’ने त्यांच्या काही जुन्या आठवणींनाही उजाळा मिळाला आहे.
LIVE : भास्कर जाधवांचा शिवसेना प्रवेश, उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून जाधवांचं शिवसेनेत स्वागत केलं, भास्कर जाधवांसोबत त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचाही शिवसेनेत प्रवेश – https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/Zozugmm0R4
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2019
2004 च्या निवडणुकीत चिपळूण विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मागण्यासाठी आलेल्या भास्कर जाधव यांना त्यावेळी ‘मातोश्री’तून हात हलवत परत जावं लागलं होतं. उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधव यांना उमेदवारी नाकारली होती. ‘मातोश्री’च्या पायऱ्यांवरून मला हाकलण्यात आलं, अशी टीका त्यावेळी जाधव यांनी केली होती. सच्च्या शिवसैनिकावर अन्याय झाला, अशी हताश खंतही जाधव यांच्या टीकेत होती.
उमेदवारी नाकारल्यानंतरही भास्कर जाधव यांनी नाउमेद न होता अपक्ष म्हणून ती निवडणूक लढवली. शिवसेनेने प्रभाकर शिंदे यांना उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रमेश कदम उमेदवार होते. त्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे रमेश कदम निवडून आले. भास्कर जाधव यांचा पराभव झाला. पण जाधवांच्या पराभवात एक मोठी मेख होती. शिवसेनेला प्रभाकर शिंदे यांचा पराभव दिसू लागताच त्यांनी आपली मते रमेश कदमांकडे वळवली, असा आरोप वजा कुजबुज त्यावेळी झाली होती.
कालांतराने भास्कर जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान परिषदेवर त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं. शिवसेनेच्या विरोधात धडाडणारी टीकेची तोफ म्हणून त्यांच्याकडे पक्षात पाहिलं जाऊ लागलं. जाधवही आपल्यावर टाकलेली जबाबदारी आणि कामगिरी चोख बजावत होते. नंतर जाधव गुहागर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्यमंत्री झाले.
दरम्यानच्या काळात भास्कर जाधव मतदारसंघात ‘भास्करशेठ’ म्हणून ओळखले जाऊ लागले. आघाडीच्या राजकारणात त्यांचा माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव निलेश राणे यांच्याशी झालेला वाद प्रचंड गाजला. या वादाचं रूपांतर अनेकदा राड्यांमध्येही झालं होतं.
राज्यात युतीची वाटचाल आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही लागलेली गळती भास्कर जाधवांनी चाणाक्षपणे हेरली. यानंतर त्यांनी राजकारणातील वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही दिवसांपूर्वी ‘मातोश्री’ची पायरी पुन्हा चढत त्यांनी उद्धव ठाकरेंशी असलेले मतभेद-मनभेद संपुष्टात आणले.
शुक्रवारी (13 सप्टेंबर) भास्कर जाधव शिवसेनेत ‘घरवापसी’च्या निमित्ताने अधिकृतपणे पुन्हा ‘मातोश्री’ची पायरी चढले. सन्मानाने पुन्हा ‘मातोश्री’ची पायरी चढण्यासाठी त्यांना 15 वर्षे वाट पाहावी लागली.