छत्रपती घराण्यात मोठा ट्विस्ट, संभाजीराजे अस्वस्थ, वडिलांमुळे वाढली चिंता, पाच दिवस नॉट रीचेबल
२ फेब्रुवारीच्या रात्री संभाजी राजे यांनी दुसऱ्या दिवशीचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द करत असल्याचे ट्विट केले. तेव्हापासून गेले पाच दिवस ते कोणाच्याच संपर्कात नाहीत. राज्यसभा निवडणुकीसाठी वडील शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने संभाजीराजे अस्वस्थ असल्याची माहिती आहे.

मुंबई | 7 फेब्रुवारी 2024 : जुन्या जखमा अजून विसरलो नाही असे म्हणत स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी गेल्याच महिन्यात कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. कोल्हापूर मतदारसंघात त्यांनी विकास कामांच्या उद्घाटन आणि दौऱ्यांचे नियोजनही केलं. महाविकास आघाडीने त्यांच्या नावाला पसंतीही दिली. सगळ सुरळीत सुरु असताना यामध्ये एक नवा ट्विस्ट आलाय. संभाजी राजे पाच दिवसांपासून अचानक नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे छत्रपती यांचे वडील शाहू महाराज छत्रपती हे नाव पुढे केले. त्यांना बिनविरोध निवडून देण्याच आवाहन देखील राऊत यांनी सर्वपक्षीयांना केलंय. पण, संजय राऊत यांच्या याच भूमिकेमुळे कोल्हापुरातील छत्रपती घराण्याची मात्र चांगलीच अडचण झाली आहे.
शाहू महाराज छत्रपती यांना राज्यसभेची आलेली ऑफर स्वीकारायची की संभाजी राजे यांनी प्रत्यक्ष लोकसभेच्या मैदानात उतरायचं यावरून आता संभ्रम निर्माण झालाय. या संभ्रमातूनच संभाजीराजे गेल्या पाच दिवसापासून नॉट रिचेबल आहेत. त्यांनी आपले कार्यक्रम देखील रद्द केलेत. येत्या 11 फेब्रुवारीला संभाजी राजे यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाची जय्यत तयारी कार्यकर्त्यांकडून सुरू असतानाच स्वतः संभाजी राजे संपर्क बाहेर गेल्यामुळे कोल्हापुरात चर्चांना उधाण आलंय.
गेल्या राज्यसभा निवडणुकीतून संभाजी राजे यांनी माघार घेतली होती. त्यानंतर त्यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली. याच संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर दौरे केले. मराठा आरक्षण, गडकोट किल्ले संवर्धन या माध्यमातून त्यांनी राज्यात रान उठवण्याचा प्रयत्न केला. नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात संभाजी राजे असतील अशी चर्चा सुरू होती. मात्र, अचानक महाविकास आघाडीकडून संभाजी राजे छत्रपती यांचे कोल्हापूरसाठी नाव पुढे आणलं गेलं होतं.
विशेषतः कॉंग्रेसने हे नाव पुढे आणले आणि महाविकास आघाडी त्याला तयार झाली. पण, राजे यांनी कोणत्या तरी एका पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रास्तव त्यांच्यासमोर ठेवण्यात आला होता. परंतु, राजे यांनी मात्र आपण स्वराज्य संघटने मधूनच निवडणूक लढविणार असे सांगितले, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये त्यांना उमेदवारी देण्यावरून तांत्रिक अडचणी निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, राज्यसभेसाठी वडील शाहू महाराज छत्रपती यांचे नाव पुढे आणून एकाच दगडात अनेक अनेक पक्षी मारण्याची तयारी सुरू असल्याची राजकीय चर्चा सुरु आहे. छत्रपती घराण्यातील व्यक्तीला राज्यसभेवर बिनविरोध आणण्याचे श्रेय घेता येईल. तसेच, त्यांना संधी दिली तर लोकसभेसाठी संभाजीराजांचे नाव आपोआपच मागे पडणार आहे. राज्यसभा निवडणुकीत माघार घेतल्यानंतर संभाजीराजे यांनी शिवसेनेवर केलेली जहरी टीका ठाकरे गट विसरलेला नाही. त्यामुळेच संजय राऊत यांनी शाहू महाराज छत्रपती यांचे नाव राज्यसभेसाठी पुढे केले असावे अशीही आणखी एक चर्चा सुरु आहे.