बिहारमध्ये पुन्हा NDA सत्तेत आल्यास महाराष्ट्रातही सत्ताबदलाच्या हालचाली!, राजकीय विश्लेषकांचा अंदाज, भाजप नेत्यांकडून मात्र इन्कार
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यास महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून केला जात आहे. भाजप नेत्यांनी मात्र या शक्यतेचा इन्कार केला आहे.

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी यावेळी काहीसा उशीर लागण्याची शक्यता आहे. मात्र, आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDAचं सरकार येण्याची शक्यता आहे. तर तेजस्वी यादव यांचा RJD आणि काँग्रेसच्या महाआघाडीला पराभवाची चव चाखावी लागू शकते. आताच्या कलानुसार बिहारमध्ये NDAचं सरकार आल्यास भाजपकडून महाराष्ट्रातही सत्तापालटाच्या हालचाली वाढू शकतात, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. तर भाजप नेत्यांकडून मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे स्वत:च्या कर्मानेच पडेल. भाजप त्यासाठी कुठलाही प्रयत्न करणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. (Analysts predict a change of government in Maharashtra if the NDA government comes to power in Bihar)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. पण शिवसेना मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे शिवसेनेनं भाजपशी फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणं पसंत केलं. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपवर सत्तेपासून दूर राहण्याची वेळ आली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला वर्ष पूर्ण होत आहे. या पूर्ण वर्षभरात महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे भाजपचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांकडून वारंवार करण्यात आला. मात्र, राज्यातील सरकार पाडण्यात आम्हाला स्वारस्य नाही. हे सरकार त्यांच्या कर्मानेच पायउतार होईल, अशी टीका भाजपकडून करण्यात येते.
महाराष्ट्रातही मध्यप्रदेश पॅटर्न?
तिकडे मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपमध्ये प्रवेश देत कमलनाथ सरकार पाडण्यात आलं. तिथे आज होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजप सत्ता राखण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे. तर बिहारमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार NDAचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास भाजपकडून महाराष्ट्रात ‘ऑपरेशन कमळ’ राबवण्यात येण्याची शक्यता काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेसचं नेतृत्व राहुल गांधी यांच्या हातात गेल्यानंतर काँग्रेस महाराष्ट्रातील सत्तेतून बाहेर पडेल. कारण शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास राहुल गांधी तयार नव्हते, असा दावा विश्लेषकांनी केला आहे. दुसरीकडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठं खातं दिलं जाईल आणि महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं सरकार दिसेल, अशी शक्यता ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी व्यक्त केली आहे. भाजपनं मात्र या शक्यतेचा इन्कार केला आहे. भाजप नेते राम शिंदे, प्रेरणा होनराव, प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा कुठलाही प्रयत्न भाजपनं केला नाही आणि पुढेही करणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राजकीय विश्लेषकांचा अंदाज खरा ठरेल का? हे बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतरच कळेल.
बिहारचा संपूर्ण निकाल हाती येण्यास मध्यरात्र होणार!
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यास रात्रीचे १२ वाजू शकतात, असा अंदाज निवडणूक आयोगानं व्यक्त केला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षीच्या निवडणूक निकालासाठी 2 ते 3 तासांचा उशीर लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मतदानासाठी एकूण 1 लाख 6 हजार 526 मतदान केंद्र उभारण्यात आले होते. जे मागील निवडणुकीच्या तुलनेत 63 टक्के अधिक होते. 2015 च्या निवडणुकीत 65 हजार 367 मतदान केंद्र होते. यंदा मतदान केंद्रांची संख्या वाढवल्यामुळं ईव्हीएम मशीनच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणूक निकालाच्या अंतिम घोषणेला उशीर लागण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या:
Bihar Election: थोडी वाट पाहा, बिहारमध्ये महागठबंधनलाच बहुमत मिळणार; राजद नेत्याचा छातीठोक दावा
Analysts predict a change of government in Maharashtra if the NDA government comes to power in Bihar