पाटणा: जेडीयूचे नेते नितीश कुमार (nitish kumar) यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भाजपशी (bjp) फारकत घेतली आहे. नितीश कुमार यांच्या या धक्कातंत्रामुळे भाजपला जोर का झटका लागला आहे. नितीश कुमार केवळ भाजपशी फारकत घेऊन थांबले नाहीत तर त्यांनी थेट आरजेडी (rjd), काँग्रेस आणि डाव्या पक्षांशी आघाडी केली आहे. तिन्ही पक्षांना घेऊन नितीश कुमार राज्यात सरकार स्थापन करणार आहेत. त्यामुळे पुढचे अडीच वर्ष भाजपला विरोधात बसावं लागणार आहे. नितीश कुमार यांनी यापूर्वीही अनेक पक्षांना अशी राजकीय शॉक ट्रीटमेंट दिली आहे. राजकीय कोलांट उड्या मारण्याचा नितीश कुमार यांचा इतिहास जुनाच आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा इतिहास माहीत असूनही अनेक राजकीय पक्ष त्यांच्याशी आघाडी करण्यास नेहमीच इच्छूक असतात. त्याला कारण म्हणजे नितीश कुमारांकडील संख्याबळ आणि त्यांची स्वच्छ प्रतिमा. त्यामुळे बिहारमधील कोणताही राजकीय पक्ष त्यांच्या जाळ्यात आपसूक ओढला जातो.