नितीश कुमारांचा मास्टरस्ट्रोक, केंद्राचा बदला राज्यात घेतला!
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (यूनायटेड) अर्थत जेडीयूला मोदी सरकारने केंद्रात केवळ एकच मंत्रिपद देऊ केलं होतं. ते मंत्रिपद नाकारत नितीश कुमार यांनी आपला स्वाभिमानी बाणा दाखवला होता. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात नितीश कुमार यांनी राज्याच्या म्हणजे बिहारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. विशेष म्हणजे, या मंत्रिमंडळ विस्तारात नितीश कुमार यांनी मास्टस्ट्रोक मारत, […]
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (यूनायटेड) अर्थत जेडीयूला मोदी सरकारने केंद्रात केवळ एकच मंत्रिपद देऊ केलं होतं. ते मंत्रिपद नाकारत नितीश कुमार यांनी आपला स्वाभिमानी बाणा दाखवला होता. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात नितीश कुमार यांनी राज्याच्या म्हणजे बिहारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. विशेष म्हणजे, या मंत्रिमंडळ विस्तारात नितीश कुमार यांनी मास्टस्ट्रोक मारत, भाजपला एकही नवीन मंत्रिपद दिलं नाही. बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत.
केंद्राचा बदला राज्यात!
नितीश कुमार यांनी आज बिहार मंत्रिमंडळाचा विस्तार केला. मंत्रिमंडळ विस्तारात नितीश कुमार यांच्या जेडीयूमधील आठ आमदारांचा समावेश झाला. विशेष म्हणजे, नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यात सत्तेतील भागीदार असलेल्या भाजप आणि लोजप यांच्यातील एकाही आमदाराला मंत्रिपद देण्यात आले नाही. त्यामुळे केंद्रात मंत्रिपद देताना मान राखला नसल्याने त्याचा बदला नितीश कुमार यांनी राज्यात घेतला का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
बिहारच्या मंत्रिमंडळात नव्याने कुणाचा समावेश?
बिहारच्या मंत्रिमंडळात आठ आमदारांनी नव्याने मंत्रिपदाची शपथ घेतली. हे आठही जण जेडीयूचे आमदार आहेत. यात अशोक चौधरी, श्याम रजक, रामसवेक सिंह, नीरज कुमार, बीमा भारती, नरेंद्र यादव, संजय झा आणि लक्ष्मेश्वर राय यांचा समावेश आहे.
नव्या मंत्र्यांचे काही वैशिष्ट्य
- लक्ष्मेश्वर राय हे जेडीयूचे प्रदेश सरचिटणीस आहेत.
- नीरज कुमार हे 2009 पासून जेडीयूचे प्रवक्ता आहेत.
- संजय झा हे भाजपमधून जेडीयूत आलेले नेते आहेत.
- अशोक चौधरी हे काँग्रेसमधून जेडीयूत आलेले नेते आहेत.
- नरेंद्र यादव हे आलमनगरमधून जेडीयूचे आमदार आहेत.
- श्याम रजक हे तब्बल सहावेळा आमदार झाले आहेत.
- बीमा भारती या बिहारमधील अतिमागास वर्गातील आमदार आहेत.
- रामसेवक सिंह हे जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.
भाजप आणि लोजपमधील एकाही आमदाराचा समावेश नाही!
बिहार मंत्रिमंडळ विस्तारात नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्ष आणि लोक जनशक्ती पक्ष यांच्यातील एकाही आमदाराला मंत्री बनवलं नाही. केंद्रात नव्या मोदी सरकारकडून नितीश कुमार यांच्या जेडीयूला एका मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, एक मंत्रिपद घेऊन केवळ नाममात्र प्रतिनिधित्व करण्यात रस नसून, आम्हाला मंत्रिपद नको, मात्र एनडीएसोबत राहू, अशी भूमिका घेत नितीश कुमार यांनी आपला स्वाभिमानी बाणा दाखवला होता. मात्र, राज्यातील म्हणजे बिहारमधील मंत्रिमंडळ विस्तारात नितीश कुमार यांनी भाजप-लोजपला आसमान दाखवत, मास्टरस्ट्रोक मारला आहे.