बिहारचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात, तिकडे ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचा तिसऱ्या आघाडीला झटका
एकीकडे देशात पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरु असताना नितीश कुमार यांच्या या प्रयत्नाला उडिसाच्या मुख्यमंत्र्यांनी झटका दिला आहे.
मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ( Nitish Kumar ) यांनी आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) आणि शरद पवार ( Sharad Pawar ) यांची भेट घेतली. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव दोघेही आज मुंबईत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांच्या विरोधात 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांचा एकजुटीचा प्रयत्न सुरु आहे. विरोधकांना एकत्र करण्यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. पण यात आता ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ‘तिसरी आघाडी’ स्थापन करण्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची ही टिप्पणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधी एकजुटीच्या मिशनला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यादरम्यान 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या एकत्रीकरणाच्या पुढाकारावर काही नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, अशी कोणतीही शक्यता नाही. माझ्या दृष्टीने अशी कोणतीही तिसरी आघाडी आता स्थापन होत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत आव्हान द्यायचं असेल तर सगळ्या विरोधकांना एकत्र यावं लागेल असं अनेक विरोधी पक्षातील नेत्यांचं मत आहे. यासाठी अनेकांकडून प्रयत्न देखील झाले. याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी देखील यासाठी प्रयत्न केले. आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून देखील हा प्रयत्न सुरु आहे. पण ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याने तिसऱ्याआघाडीला झटका लागला आहे.
नवीन पटनायक म्हणाले की,“मी ओडिशाच्या विकास कामांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि विकासाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. आम्ही पुरीमध्ये उभारू इच्छित असलेल्या श्री जगन्नाथ आंतरराष्ट्रीय विमानतळाविषयी मी पंतप्रधान मोदींशी बोललो. भुवनेश्वरला सध्या खूप ट्रॅफिक होत आहे, त्यामुळे आम्हाला तिथे विस्तार करायचा आहे. ओडिशाच्या विकासासाठी मी केलेल्या मागण्यांबाबत पंतप्रधानांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
नितीश कुमार यांच्या भेटीबाबत विचारले असता नवीन पटनायक म्हणाले की, ही शिष्टाचाराची भेट होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी नितीश कुमार विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. नितीश यांनी पटनायक यांची भेट घेतल्यानंतर आपला कोणताही राजकीय हेतू नसल्याचे सांगितले होते. पटनायक यांच्याशी त्यांचे जुने संबंध आहेत. आमच्यात इतका परस्पर आदर आहे की आम्हाला राजकारणाची काळजी करण्याची गरज नाही. त्यानंतर नितीश यांच्याशी युती करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे पटनायक म्हणाले होते. आमची मैत्री जुनी आहे आणि आम्ही दीर्घकाळ सहयोगी म्हणून काम केले आहे. आज कोणत्याही युतीबाबत चर्चा झाली नाही. पुरीमध्ये बिहार भवन बांधण्यासाठी बिहार सरकारला जमीन मोफत दिली जात आहे.