मध्यप्रदेश, राजस्थानात काँटे की टक्कर, कल आले, धाकधूक वाढली
राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. त्यानुसार या चारही राज्यांपैकी दोन राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस दिसत आहे. तर इतर दोन राज्यांमध्ये काँग्रेस निर्विवाद बहुमताच्या दिशेने जाताना दिसत आहे. मात्र, निकाल सुरू होताच काँग्रेसने या चारही राज्यात त्यांची सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे कल हाती यायला सुरुवात झाली आहे. या चारही राज्यांमधील निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष आहे. त्यातही राजस्थान, मध्यप्रदेश आणि तेलंगणाच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. या तिन्ही राज्यात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार कलही हाती येत आहे. मात्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर होताना दिसून येत आहे. पहिल्या कलानुसार मध्यप्रदेशात काँग्रेस आणि राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यात सत्ताबदल होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
पहिल्या कलानुसार मध्यप्रदेशात भाजप 85 तर काँग्रेस 74 जागांवर आघाडीवर आहे. तर राजस्थानात भाजप 85 आणि काँग्रेस 74 जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्येही काँग्रेस आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस 38 आणि भाजप 31 जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणातही काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. तेलंगणात काँग्रेसला 52 तर सत्ताधारी बीआरएसला 28 जागा मिळताना दिसत आहे. भाजप आणि एमआयएम प्रत्येकी 3 जागांवर आघाडीवर आहे.
आमदार फुटू नये म्हणून
दरम्यान, राजस्थान आणि मध्यप्रदेशात दोन्ही पक्षांमध्ये जोरदार चुरस सुरू आहे. या दोन्ही राज्यात सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षांना काही आमदार कमी पडण्याची शक्यता आहे. अशावेळी आमदारांची फोडाफोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या संभाव्य आमदारांना घोडेबाजारापासून वाचवण्यासाठी रिसॉर्टमध्ये ठेवण्यात येणार आहे. काँग्रेसने सर्व उमेदवारांना जयपूर येथे एकत्र जमा होण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रातील नेत्यांवर जबाबदारी
चारही राज्यात दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेसने चार राज्यात महाराष्ट्रातील नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे चारही नेते चारही राज्यांमध्ये जाणार आहेत. चारही राज्यात काँग्रेसची सत्ता स्थापन करण्यासाठी हे नेते प्रयत्न करणार आहेत. एकही आमदार फुटणार नाही याची खबरदारीही या नेत्यांकडून घेतली जाणार आहे. तसेच कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यावर तेलंगणाची जबाबदारी देण्यात आली आहे.