मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने मावळमधील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज (18 नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं वर्चस्व आहे. मागील अनेक दिवसांपासून स्थानिक पातळीपर्यंत विस्तारण्याचा राष्ट्रवादीकडून प्रयत्न केला जातोय. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीमध्ये मोठ्या संख्येने इनकमिंग सुरु झाली आहे. आज मावळ भागातील काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात मावळ मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते तसेच माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलताना मावळ भागात विकास कामे जोराने सुरू आहेत. सर्वांनी तरुण नेतृत्व स्वीकारले आहे. यात आपण सर्व गट-तट सोडून एकत्र आला आहात. मावळ तालुक्याला काहीही कमी पडणार नाही याची जबाबदारी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. तेव्हा मावळच्या विकासासाठी आपण आता एकसंघ होऊया, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. यापुढे सर्वांनी मिळून स्थानिक पातळीवर बूथ कमिट्या सक्षम करण्याचे काम करावे. यातूनच आता असलेल्या विधानसभेच्या 54 जागांवरून आपण 100 जागांपर्यंत पोहोचू असे म्हणत जयंत पाटील यांनी नव्याने पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना त्यांनी मावळ तालुक्याच्या राजकाणाबद्दल विसृत भाष्य केले. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठी साथ लाभली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत मावळ तालुक्याचे चित्र पालटले. सुनील शेळके यांना चांगलाच जनआशीर्वाद लाभला. हा इतका मोठा आहे की आता कोणीही तिथे आपला प्रभाव दाखवू शकत नाही. आजचा होणारा पक्षप्रवेश हा लोकांच्या या पाठबळाला अधिक ताकद दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील – नागराळकर, माजी आमदार विद्याताई चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख उपस्थित होते.
इतर बातम्या :
मुस्लिम आरक्षणासाठी समाजानं रस्त्यावर उतरावं का? औरंगाबादमध्ये ओवेसींचे सरकारला 5 सवाल