Special Report | राहुल गांधी, वादग्रस्त विधान आणि उद्धव ठाकरे यांना घेराव
राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन आता भाजपनं उद्धव ठाकरेंनाही घेरलंय.
मुंबई : भारत जोडो यात्रेत, राहुल गांधींच्या एका वक्तव्यामुळं महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय. इंग्रजांकडून पेंशन घेऊन सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली, अशी टीका राहुल गांधींनी केली. त्यानंतर भाजप अधिक आक्रमक झालीय. तर दुसरीकडे राहुल गांधींवरुन आता भाजपनं उद्धव ठाकरेंनाही घेरलंय.
राहुल गांधींच्या याच वक्तव्यानं, महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलंय. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली. इंग्रजांकडून पेंशन घेऊन भारताच्या विरोधात काम केलं, अशी टीका राहुल गांधींनी केली. आणि राहुल गांधींच्या विरोधात रोष निर्माण होणं सुरु झालं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तर सावरकरांचा अपमान करणारे विचारच जमीन गाडणार असा इशाराच दिला. त्यानंतर राहुल गांधी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन सावरकरांचं पत्र दाखवून, फडणवीसांना प्रतिआव्हान दिलं.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आलीय. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणा या 4 राज्यातनंतर ही यात्रा सध्या विदर्भात आहे. पण महाराष्ट्रात राहुल गांधी सावरकरांबद्दल टीका करुन, वादाला फोडणी दिलीय.
राहुल गांधींनी सावरकरांबद्दल असं बोलल्यानंतर भाजप आणि शिंदे गट आक्रमक होणारच होता. फडणवीसांनी इशारा दिला. तर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी भारत जोडो यात्राच थांबवण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदेंकडे केली.
राहुल गांधींनी सावरकरांचा घोर अपमान केल्याचं सांगत इकडे, भाजपनं ठाकरेंना घेरलंय. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरेही सहभागी झाले. त्यावरुन फडणवीसांनी निशाणा साधलाय. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींसोबत आदित्य ठाकरे चालतायत, बाळासाहेबांना काय वाटत असेल ? असं फडणवीस म्हणालेत.
दुसरीकडे राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्याशी सहमत नाही, असं स्पष्ट करत उद्धव ठाकरेंनी संघ आणि भाजपचं स्वातंत्र्यातल्या लढ्यातील योगदान काढलंय.तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही मनसैनिकांना निषेध व्यक्त करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार शेगावच्या राहुल गांधींच्या सभेत, निषेध व्यक्त करणार असल्याचं मनसेच्या संदीप देशपांडेंनी म्हटलंय.
वार पलटवार सुरु असतानाच, राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यभरात आंदोलनंही झालीत. नागपुरात भाजप युवा मोर्चा आणि महिला आघाडीचं आंदोलन केलं. औरंगाबादेत भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
कोल्हापुरातल्या इचलकरंजीत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. पुण्यात शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी जोडे मारो आंदोलन केलं.
ठाण्यात शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी जोडे मारो आंदोलन करत, राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी केली. तर डोंबिवलीतही शिंदे गटानं जोडे मारो आंदोलन करुन, राहुल गांधींच्या घोषणा दिल्या
मात्र असं असलं तरी राहुल गांधी आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्यामुळं वाद तूर्तास तरी शांत होण्याची चिन्हं नाहीत.