मुंबई: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejrival) यांनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीच्या फोटो छापण्याची मागणी केली आहे. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये नोटांवर कुणाचे फोटो असावेत याची मागणी करण्याची जणू स्पर्धाच रंगली आहे. नोटांवर फोटो छापण्यासाठी कुणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव सूचवलंय. कुणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव सूचवलंय. तर कुणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव सूचवलं. आता तर चक्क भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांचा फोटो नोटांवर असावा अशी मागणी केली आहे. भाजपने ही मागणी करताच ठाकरे गटाने त्याला काऊंटर मागणी केली आहे. नोटांवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेच (balasaheb thackeray) हवेत, अशी मागणीच शिवसेनेने केली आहे.
भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा गौरव वाढवला आहे. त्यांनी देशासाठी मोठा त्याग केला आहे, असं म्हणत राम कदम यांनी त्यांच्या ट्विटरवर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेल्या नोटा पोस्ट केल्या आहेत. कदम यांनी या नोटा पोस्ट करून थेट मोदी यांचा फोटो नोटेवर असावा अशी मागणीच केली आहे.
त्यानंतर राम कदम यांनी मीडियाशी संवाद साधला. या चर्चेची सुरुवात केजरीवाल आणि विरोधी पक्षाच्या अन्य नेत्यांनी केली. दोन दिवसाने किंवा आठवड्याभरात गुजरात निवडणुकीचा आरंभ होईल. त्याचवेळी अचानक केजरीवाल यांना आमच्या हिंदू धर्माची, देवी देवतांची आठवण येते. इतर वेळेस हे केजरीवाल झोपले होते. निवडणुका जवळ आल्यावर काँग्रेस आणि केजरीवाल यांना हिंदू आठवतात. देवी देवता आठवतात. त्यांच्या मागणीत प्रामाणिकपणा असता तर देशाने त्याचं स्वागत केलं असतं, असं राम कदम म्हणाले.
याच केजरीवाल यांनी आमच्या स्वास्तिक चिन्हाला विरोध केला होता. केजरीवाल आणि कंपनी त्याचा विरोध करायची. निवडणुका आहे. म्हणून देवी देवतांची मागणी करेल. हा दुटप्पीपणा आहे. त्यांच्या या ढोंगीपणाला आमचा विरोध आहे, असं त्यांनी सांगितलं.
मोदींच्या फोटोंबाबत ही कार्यकर्ता म्हणून मागणी नाही. या देशाची जनभावना काय आहे. लोकभावना काय आहे हे मांडण्याचा प्रयत्न आहे. कोणत्याही फोटोला विरोध नाही. शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचे फोटो जगाला प्रेरणा देणारे आहेत. सावरकरांचं योगदान नाकारता येणार नाही. मोदींनी या देशाचं वैभव मिळवून दिलं. त्यांनी हे महान काम केलं. जगातील दोन महत्त्वाचे देश भांडत आहेत. ते मोदींकडे याचना करत आहेत. यावरून मोदींचं कर्तृत्व अधोरेखित होतं, असंही ते म्हणाले.
दरम्यान, ठाकरे गटाच्या शिवसेनेकडूनही फोटोंबाबत प्रतिक्रिया आली आहे. शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी यावर भाष्य केलं आहे. शिवसेनेने कोणतीही अधिकृत मागणी केलेली नाही. शिवसेना हा गरिबांचा पक्ष आहे. शिवसेना या भानगडीत कधी पडत नाही. मला विचाराल नोटांवर कुणाचा फोटो असावा तर मी सांगेन बाळासाहेबांचा फोटो हवा, अशी उपरोधिक मागणी अनिल परब यांनी केली.
बाळासाहेबांचा नोटांवर फोटो असावा त्याचं कारण असं आहे की माझा नेता असायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असेल तर मी तर शिवसेनेचा आहे. मला तसं वाटणं स्वाभाविक आहे. त्यामुळे मी बाळासाहेबांचा फोटो असायला पाहिजे हे सांगणारच. पण माझ्या वाटण्याला काही महत्त्व नाही. शेवटी सरकार ठरवत असतं कोणता फोटो असावा. हे जाणूनबुजून केलेल वाद आहेत, असं अनिल परब म्हणाले.