बीड : आगामी लोकसभेच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत आढावा बैठक घेऊन संभाव्य उमेदवार निश्चित केल्यानंतर, भाजपनेही राज्यातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या आढाव्याच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे बीडमध्ये होते. त्यावेळी त्यांनी बीडमधील भाजपचा उमेदवार कोण असेल, हे जाहीरच करुन टाकले. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, ते लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत.
बीड लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार प्रीतम मुंडेच असतील, यात कोणतीही शंका नाही, असं वक्तव्य करुन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एकप्रकारे बीड लोकसभा मतदारसंघाचा उमेदवारच जाहीर करु टाकला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवेंसह प्रदेश संघटक विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत बीड येथे भाजपची बैठक झाली. जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये नव्याने मोट बांधण्याच्या अनुषंगाने या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत दानवे यांनी खासदार प्रीतम मुंडेच लोकसभेच्या उमेदवार असतील. यावर शिकामोर्तब केलाय.
काही दिवसांपूर्वीच झालेल्या सर्वेक्षणात प्रीतम मुंडेंच्या कामावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे बीड लोकसभा मतदार संघाचा उमेदवार कोण, याची उत्सुकता होती. मात्र आज खुद्द प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रीतम मुंडे याच अंतिम त्यामुळे राष्ट्रवादी आता नेमका कोणता उमेदवार देणार याकडे लक्ष लागले आहे.
भाजपा सरकारने 90 टक्के विकासाचे काम पूर्ण केले आहेत. मात्र विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजपाला आगामी निवडणुकीसाठी विरोध करत आहेत. परंतु त्यांचे हे स्वप्न साकार होणार नसून विकास कामावर आणि संघटनेच्या बळावर आम्ही आगामी निवडणूक जिंकून पुन्हा सत्तेत येणार असल्याचा आत्मविश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
महाराष्ट्रातील 48 मतदर संघात रावसाहेब दानवे, प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाची आढावा बैठक घेण्यात येत आहेत. त्यानिमित्ताने बीडमध्ये शुक्रवारी आढावा बेठक घेण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक, पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे, आमदार भीमराव धोंडे, आमदार संगीता ठोंबरे, आमदार सुरेश धस, आमदार आर. टी. देशमुख आदींची उपस्थिती होती.