सामनाचा अग्रलेख म्हणजे ‘खाली डोकं वर पाय’; आशिष शेलारांची खरमरीत टीका
त्यामुळे दुजाभावाचं राजकारण शिवसेना करत आहे, अशी खरमरीत टीका आशिष शेलारांनी केली आहे. (BJP Ashish Shelar Criticizes Saamana Editorial)

मुंबई : “आजच्या सामना अग्रलेखाला खाली डोकं वर पाय असं म्हणावं लागेल. महाराष्ट्रात कोरोनाचे आकडे सर्वात जास्त का आहे? मृत्यूची संख्या सर्वात जास्त का आहे? मग याच पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घ्यायचं नाही का?” असा खोचक सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. (BJP Ashish Shelar Criticizes Shivsena Saamana Editorial)
“दुजाभावाचं राजकारण शिवसेना करतेय”
मुख्यंत्री उद्धव ठाकरे रोज केंद्रापुढे हात जोडत आहे. लस द्या, जीएसटीचा पैसा द्या, आम्हाला एअरफोर्सची सुविधा द्या, 18 वर्षांवरील लसीकरणाची परवानगी द्या, या सर्व गोष्टी केंद्र सरकार पुरवत आहे. तरीही केंद्राला दोष द्यायचा. त्यामुळे दुजाभावाचं राजकारण शिवसेना करत आहे, अशी खरमरीत टीका आशिष शेलारांनी केली आहे.
“जनतेच्याच रोषाला सामोरं जायला तयार राहावं”
मुंबई महापौर किशोरी पेडणेकर आणि स्थायी समिती अध्यक्षांचा नालेसफाईचा दौरा म्हणजे आंधळी कोशिंबीरचा खेळ आहे. कारण ‘तेरी भी चूप मेरी भी चूप. आम्ही दावा करू शकत नाही की पाणी तुंबणार नाही असं म्हणून पळ काढता येणार नाही. जनतेला सुविधा द्यायला हव्यात आणि जर त्या दिल्या नाहीत तर किंबहुना, किंबहुना ते असे म्हणतात म्हणून जनतेच्याच रोषाला सामोरं जायला तयार राहावं, असेही शेलार म्हणाले.
सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय?
कोरोनाचा परिपूर्ण अभ्यास आणि त्यानुसार प्रभावी उपायांची काटेकोर अंमलबजावणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी महाराष्ट्र करीत आहे. महाराष्ट्राच्या जनतेला अशा संकटसमयी मुख्यमंत्र्यांचा आधार वाटतो, हे दिलासादायक आहे. मुख्यमंत्री ठाकरे या संकटकाळात जणू ‘कोविडॉलॉजिस्ट’च झाले. त्यांनी या संकटाचा खोलवर अभ्यास केला व आता महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचे फॅमिली डॉक्टर बनून ते झोकून काम करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्राला धोक्याची पातळी ओलांडू दिली नाही. लोकांना हिंमत देण्याचे व संकटाशी लढण्याचे आत्मबळ देण्याचे काम फॅमिली डॉक्टर बनून मुख्यमंत्री ठाकरे करत आहेत. त्यांचे हात मजबूत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे, असा सल्ला शिवसेनेनं अप्रत्यक्षरित्या विरोधकांना दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सच्या तज्ञ डॉक्टरांबरोबरच हजारभर ‘फॅमिली डॉक्टरां’शी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले की, ‘आतापासूनच लहान मुलांवर लक्ष द्या. मुलांमध्ये आढळणारे जे व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, ताप, खोकला, डायरिया, दूध न पिणे, भूक न लागणे या लक्षणांकडे खास लक्ष द्या,’ अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. हे एका कुटुंबप्रमुखाचेच लक्षण आहे, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंची पाठ थोपाटण्यात आली आहे.(BJP Ashish Shelar Criticizes Shivsena Saamana Editorial)