शेवटी मैत्रिणीच की… रुपाली चाकणकर यांच्या निवडीनंतर चित्रा वाघ यांचं पहिलं ट्विट!
चित्रा वाघ राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा असताना चाकणकर यांच्याकडे पुणे शहर महिला राष्ट्रवादीचं अध्यक्षपद होतं. त्याकाळात चाकणकर आणि चित्रा वाघ यांची घनिष्ठ मैत्री होती. त्यांच्या मैत्रीचा बॉन्ड पक्का होता.
मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचं अभिनंदन केलं आहे. “रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते”, असं ट्विट त्यांनी केलं आहे. पहिल्यांदा रावणाला मदत करणारी शूर्पणखा नको, अशी भूमिका घेत चाकणकरांवर आसूड ओढणाऱ्या चित्रा वाघ यांनी चाकणकरांची निवड होताच मैत्रीला जागत त्यांचं अभिनंदन करणारं ट्विट केलं आहे.
पहिल्यांदा विरोध, आता शुभेच्छा!
रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चित्रा वाघ काय प्रतिक्रिया देणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. कारण ज्यावेळी चाकणकरांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होतं, त्यावेळी रावणाला मदत करणारी शूर्पणखा अध्यक्षपदी नको, अशी भूमिका घेत चाकणकरांच्या निवडीला चित्रा वाघ यांनी विरोध केला होता. मात्र काल रात्री (बुधवारी) चाकणकरांच्या निवडीची अधिकृत घोषणा झाली. राजकारण्यांनी अभिनंदनाचे ट्विट करायला सुरुवात केली. ज्यानंतर चित्रा वाघ यांच्या ट्विटकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. परंतु अपेक्षेप्रमाणे चित्रा वाघ यांनी चाकणकरांचं अभिनंदन करणारं ट्विट केलं आहे. पण हे ट्विट करताना त्यांनी भाजपच्या लढ्याला यश आलं असं म्हणताना राज्य सरकारला सल्लाही दिला आहे.
2 वर्षापासून #BJP ने दिलेल्या लढ्याला यश मिळालं
राज्य सरकारला महिला आयोगाला अध्यक्ष नेमण्यास अखेर मुहूर्त सापडला
अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती झाली मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते
तसेचं इतर सदस्यांची नियुक्तीही त्वरीत करावी म्हणजे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू होईल
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 21, 2021
चित्रा वाघ यांच्या ट्विटमध्ये काय?
2 वर्षापासून भाजपने दिलेल्या लढ्याला यश मिळालं. राज्य सरकारला महिला आयोगाला अध्यक्ष नेमण्यास अखेर मुहूर्त सापडला. अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती झाली. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते तसेच इतर सदस्यांची नियुक्तीही त्वरीत करावी म्हणजे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरु होईल, असं त्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.
रुपाली चाकणकर-चित्रा वाघ यांच्यातील मैत्रीचा बॉन्ड
चित्रा वाघ यांनी 2019 मध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्याअगोदर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून काम पाहिलं. राष्ट्रवादीत असताना महिला प्रश्नावर त्यांनी आक्रमक होत तत्कालिन फडणवीस सरकारला सळो की पळो करुन सोडलं. एकंदरित महिलांच्या प्रश्नांवर चित्रा वाघ यांचं चांगलं काम आहे. परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकी आधी काही मुद्द्यांवरुन चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.
तत्पूर्वी चित्रा वाघ राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा असताना चाकणकर यांच्याकडे पुणे शहर महिला राष्ट्रवादीचं अध्यक्षपद होतं. त्याकाळात चाकणकर आणि चित्रा वाघ यांची घनिष्ठ मैत्री होती. अनेकदा पक्षाच्या बैठकीनिमित्त, काही कार्यक्रमांतून, जाहीर सभांच्या निमित्ताने तर कधी वैयक्तिक सुख-दु:खाच्या क्षणी त्या एकमेकांना भेटायच्या. चर्चा करायच्या. एकंदरित त्यांच्या मैत्रीचा बॉन्ड पक्का होता.
परंतु चित्रा वाघ यांनी 2019 भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी चाकणकरांकडे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेली. यानंतरच्या जवळपास दोन वर्षात चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात या ना त्या कारणावरुन संघर्ष पाहायला मिळाला. परंतु आता मैत्रिणीची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड होताच अभिनंदन करणारं ट्विट करुन चित्रा वाघ यांनी मित्रत्वाची जबाबदारी पार पाडली आहे.
(BJP Chitra Wagh Tweet on Rupali Chakankar Appoints As Chairperson of State Women Commission )
हे ही वाचा :
अखेर राज्य महिला आयोगाला अध्यक्ष मिळाला! सरकारकडून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती