BJP Meeting: सुधीर मुनगंटीवारांनी केला इशारा जाता जाता, व्हिक्ट्री साईनचा अर्थ काय?
राज्यातील कारभार सुरळीत चालू ठेवण्यासाठी आपत्कालीन स्थितीत विशेष अधिवेशन बोलवून महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार राज्यपालांना असतो, असे जाणकार सांगतायत. त्यामुळे आता भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने जोरकस प्रयत्न केल्यास सत्तास्थापनेबाबत राज्यपाल महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
मुंबईः एकिकडे सुप्रीम कोर्टातील एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) दाखल केलेल्या याचिकेवर पहिल्या दिवशीच्या सुनावणीत शिंदे गटाला दिलासादायक घटना दिसून आल्या. तर दुसरीकडे भाजपच्या (BJP) गोटातही आनंदाला उधाण आल्याचं दिसून येत आहे. भाजपच्या कोअर समितीची बैठक आज पाच वाजता बोलावण्यात आली आहे. यावेळी बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं विजयी झाल्याचे भाव दिसत होते. प्रवीण दरेकर असो किंवा सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), कायदेशीर लढाई जणू भाजपनेच जिंकलीय, अशा आविर्भावात हे नेते दिसून आले. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या पाठिशी भाजपाच भक्कमपणे उभा होता, या दाव्यात तथ्य असल्याचे स्पष्ट होत आहे. येत्या काळात याच शिंदेसेनेसोबत भाजप सत्तास्थापन करण्याचा दावा करू शकते, अशीही दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातील हालचालींना प्रचंड वेग आलाय.
मुनगंटीवारांचे विजयी संकेत कशासाठी?
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर काही दिवसांपासून भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. आज एकिकडे एकनाथ शिंदे गट राज्यपालांना महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचं पत्र पाठवण्याची तयारी करत आहेत तर दुसरीकडे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर सुरू आहे. यासाठी प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवर आदी नेते उपस्थित राहणार आहेत. बैठकीसाठी सुधीर मुनगंटीवार सागर बंगल्यावर आले तेव्हा त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र त्यांच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होतं आणि दोन बोटांनी त्यांनी व्हिक्ट्रीचं चिन्ह दाखवलं.. यावरून सत्तास्थापनेसाठीचा भाजपाचा रस्ता आता मोकळा होतोय, अशीच शक्यता दिसून येतेय.
सत्तास्थापनेचा चेंडू राज्यपालांकडे
सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटातील आमदारांना आताच अपात्र ठरवता येणार नाही, असं म्हटल्यामुळे एकनाथ शिंदे गटाला चांगलच स्फूरण चढलं आहे. शिंदे गटातील आमदारांना निलंबित करून त्यांची शक्ती कमकुवत करण्याचे शिवसेनेचे सर्व प्रयत्न सपशेल फेल गेल्याचं दिसून येत आहे. यातच 11 जुलै रोजी पुढील सुनावणी असल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे हात बांधल्याची स्थिती आहे. तर शिंदे गटाने राज्यपालांना महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेण्यासाठी पत्र देण्याची तयारी सुरु केली आहे. राज्यातील कारभार सुरळीत चालू ठेवण्यासाठी आपत्कालीन स्थितीत विशेष अधिवेशन बोलवून महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार राज्यपालांना असतो, असे जाणकार सांगतायत. त्यामुळे आता भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने जोरकस प्रयत्न केल्यास सत्तास्थापनेबाबत राज्यपाल महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.