तीन महिन्याच्या आमदारकीसाठी सेना-भाजपमध्ये तणाव
नागपूर : काटोल विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरुन आता शिवसेना आणि भाजप युतीत तणाव निर्माण झाला आहे. काटोलचे भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर, या जागेवर 11 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. भाजपचा आमदार विजयी झाल्याने, युतीत अपरिहार्याने भाजपकडे जाणाऱ्या या जागेवर शिवसेनेनेही दावा केला आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजप युतीत तणावाची स्थिती […]
नागपूर : काटोल विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरुन आता शिवसेना आणि भाजप युतीत तणाव निर्माण झाला आहे. काटोलचे भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर, या जागेवर 11 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. भाजपचा आमदार विजयी झाल्याने, युतीत अपरिहार्याने भाजपकडे जाणाऱ्या या जागेवर शिवसेनेनेही दावा केला आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजप युतीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
काटोलमधून शिवसेनेचा उमेदवार द्यावा, अशी मागणी काटोलच्या स्थानिक शिवसैनिकांनी केल्यानंतर, आता भाजपचे स्थानिक पदाधिकारीही पुढे आले आहेत. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काटोलची जागा भाजपनेच लढवावी, अशी मागणी झाली आहे. काटोलमध्ये शिवसेनेपेक्षा भाजपची ताकद जास्त असल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा दावा आहे.
उद्या तिढा सुटणार?
नागपुरात उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एका मंचावर येण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील युतीच्या पदाधिकाऱ्यांचं उद्या नागपुरात संमेलन असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही उपस्थिती असेल. तिन्ही नेते युतीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून, निवडणुकीचं नियोजनही करणार आहेत. याच दरम्यान उद्या काटोलच्या जागेचा तिढाही सुटण्याची शक्यता आहे.
काटोलमध्ये काय झालं?
2014 ची विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढली होती. त्यावेळी काटोल विधानसभा मतदारमधून भाजपच्या तिकिटावर डॉ. आशिष देशमुख विजयी झाले होते. मात्र, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा, शेतकऱ्यांचे प्रश्न इत्यादी मुद्द्यांवरुन डॉ. आशिष देशमुख स्वपक्षाच्या सत्तेवर नाराज झाले आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे काटोलची जागा गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहे.
अखेर लोकसभेच्या निवडणुकांसोबत काटोलच्या जागेवरही मतदान होणार आहे. येत्या 11 एप्रिलला इथे मतदान पार पडेल. मात्र, या जागेवरुन जिंकून येणाऱ्या आमदाराला केवळ तीन महिन्यांचा कालावधी मिळेल. त्यामुळे कुणीही लढण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसत नव्हते. मात्र, आता काटोलमधील शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत, थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे साकडं घातलं आहे की, काटोलमधून सेनेचा उमेदवार उभा करावा.
शिवसेना-भाजप युती झाल्याने काटोलची जागा कुणाला मिळणार, याबाबत शंका असल्याने काटोलमधील शिवसैनिकांनी थेट उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि काटोलमधून सेनेचा उमेदवार द्यावा, अशी मागणी केली. आता येत्या 11 एप्रिलपर्यंत हे स्पष्ट होईल की, काटोलची जागा शिवसेना लढवणार की भाजप?
काटोल विधानसभा
नागपुरातील काटोल विधानसभा मतदारसंघावर महाराष्ट्राच्या स्थापनेपासून कायम काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र1995 साली अनिल देशमुख अपक्ष म्हणून आणि पुढे तेच अनिल देशमुख राष्ट्रवादीकडून जिंकत गेले. त्यामुळे पुढे काटोल राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ठरला. मात्र 2014 साली डॉ. आशिष देशमुखांनी राष्ट्रवादीच्या ताब्यातून काटोल खेचून आणलं आणि जिंकले. मात्र, विदर्भाचा मुद्दा, शेतकऱ्यांचा मुद्दा इत्यादी मुद्द्यांवरुन डॉ. आशिष देशमुख यांनी राजीनामा दिला.
डॉ. आशिष देशमुखांचा राजीनामा
डॉ. आशिष देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे सुपुत्र आहेत. अत्यंत उच्चशिक्षित असलेले डॉ. आशिष देशमुख यांनी भाजपकडून विधानसभा लढवली आणि जिंकलेही. मात्र, विदर्भातील विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी सत्ताधारी स्वपक्षावरच नाराजी व्यक्त केली आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे काटोल विधानसभा मतदारसंघात आता पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.