मुंबई | 13 ऑगस्ट 2023 : आमचे अनेक सीनियर नेते मंत्री होणार आहेत. एकनाथ शिंदे हे ज्युनिअर असल्याने हे नेते त्यांच्या हाताखाली काम करू शकणार नाहीत. त्यामुळे तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, अशी गळ मला शरद पवार यांनी घातली. शरद पवार यांच्या आग्रहामुळेच मी मुख्यमंत्रीपद स्वीकारले. मला मुख्यमंत्री होण्याची हौस नव्हती, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार स्पष्ट केलं आहे. तसेच भाजपने अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळला नाही. त्यामुळे युती तुटल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. पण मुख्यमंत्री कुणाला करणार होते हे उद्धव ठाकरे यांनी कधीच स्पष्ट केलं नाही. मात्र, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केलं आहे. जे उद्धव ठाकरे यांनी कधीच सांगितलं नाही, तेच राऊत यांनी सांगितलं आहे.
शिवसेना फुटण्यापूर्वी काय झालं होतं? याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली होती. एकनाथ शिंदे माझ्याकडे आले होते. तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. तेव्हा मी तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे काय? असं विचारलं होतं, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. तसेच 2019मध्ये भाजपने अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला पाळला असता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले असते, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे.
2019मध्ये केवळ अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावरून युती तुटल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. पण 2019मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास भाजपचा विरोध होता म्हणून युती तुटली असं कधीच उद्धव ठाकरे यांनी म्हटलं नव्हतं. पण संजय राऊत यांनी वेगळीच माहिती देऊन धमका केला आहे.
2019मध्ये एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून युती तोडत असल्याचं म्हटलं होतं. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे माहीत नसावं. मोदी कुणाला चुकीची माहिती देत आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोकमधून केला आहे.
भाजपने दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळे 2019मध्ये दुसऱ्यांदा युती तुटली. एकनाथ शिंदे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्यास भाजपने नकार दिला होता. त्यामुळे युती तुटली होती, असा दावा करतानाच त्याच शिंदेंना भाजपने आता मुख्यमंत्री केले आहे. मोदींनी या घडामोडींवर बोललं पाहिजे, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.
भाजपने अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला मान्य केला नाही. त्यांनी तुमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? अशी विचारणा केली होती. त्यावर आम्ही एकनाथ शिंदे यांचं नाव सूचवलं. शिंदे यांचं नाव सूचवल्यावर भाजपने युती तोडली. आज ते भंपकपणा करत आहेत. आज मात्र, त्याच शिंदे यांना सोबत घेऊन राज्य चालवत आहेत. त्यांनाच मुख्यमंत्री केलं आहे. यावरून भाजप किती कारस्थानी आहे हे स्पष्ट होतंय, असंही ते म्हणाले.
शिवसेना आणि भाजपची युती 25 वर्षापासून होती. या काळात मोदी आणि अमित शाह हे कुठेच नव्हत. 2014मध्ये गुजरातची ही जोडगोळी दिल्लीत अवतरली. आणि त्यांनी युती तोडली. मोदी 2019चा दाखला देत आहेत. पण मुळात 2014 मध्ये युती तोडली होती. एकनाथ खडसे यांनी फोन करून ही माहिती दिली होती, असं राऊत म्हणाले.