‘उद्धव ठाकरेंनी मला स्पेशल विमानतळावर बोलवलं, हात पकडून…’, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर वाबनकुळे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी घडलेल्या एका घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेची युती होती. त्यावेळी शिवसेनेचा उमेदवार निवडून यावा म्हणून आपण दिवसरात्र प्रयत्न केले होते, असा दावा बावनकुळेंनी केला.
मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात सातत्याने संघर्ष सुरु असतो. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या फोटोमुळे एकच खळबळ उडाली. त्यांनी कॅसिनोतला फोटो ट्विट केला होता. संबंधित फोटोतील व्यक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत, अशी चर्चा सुरु होती. पण भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर संबंधित दावा फेटाळला होता. तसेच बावनकुळे यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली. आपण गेल्या 34 वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करतोय. त्यामुळे एका फोटोमुळे आपल्या इमेजवर काही परिमाण होणार नाही, असं प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिलं आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला चंद्रेशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ठाकरेंसोबत युती असताना ठाकरेंनी आपल्याला काय सांगितलेलं, याबाबतचा मोठा दावा केला आहे. महायुतीत असताना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची रामटेकची जागा निवडून यावी यासाठी आपल्याला स्पेशल नागपूरच्या विमानतळावर बोलावलं होतं, असा दावा बावनकुळेंनी केलं.
चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
“राज्याचं गृह खातं अत्यंत सक्रीय झालंय. आरोपीला कोठडीपर्यंत जाण्यापर्यंतचा फॉलोअप गृहखातं घेतं. आता राजकारणाकरता ज्यांना आपली दुकानं चालवायची आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करुन आपलं दुकान थोड्या वेळापुरता चालवू शकतात. पण महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला माहिती आहे की, 13 कोटी जनता ही देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यामुळे सुरक्षित आहे. तेच या महाराष्ट्राला सुरक्षित ठेवू शकतात”, असं बावनकुळे म्हणाले.
“किती खोटारडेपणा आहे ते संपूर्ण महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेने बघितलं आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपच्या युतीत जागेचं वाटप झालं तेव्हा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी माझा हात पकडून मला सांगितलं की, रामटेकची जागा बावनकुळे काही करुन निवडून आले पाहिजेत. मला स्पेशल विमातळावर बोलवलं. त्यांनी माझा हात पकडून रामटेकची जागा निवडून आलीच पाहिजे असं सांगितलं. त्यावेळी मी नागपूरचा पालकमंत्री होतो. आम्ही उद्धव ठाकरेंचा सन्मान केला. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या सर्व जागा निवडून याव्यात यासाठी दिवसरात्र काम केलं. हेच महाशय आहेत, जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं जाहीर केलं तेव्हा तिथे होते. महाराष्ट्राची जनता 2024 मध्ये बदला घेईलच”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.