EC Decision on NCP | ‘चपराक वैगेरे मी…’, राष्ट्रवादीच्या निकालावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
NCP News | "2019 मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला, त्यांना लोकशाही काय असते हे समजले आहे. लोकशाहीने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. चपराक वैगेरे मी म्हणत नाही" असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मुंबई : भविष्यात महाराष्ट्रात एक वेगळ राजकारण पहायला मिळू शकतं. राजकारणाची दिशा बदलणारा एक महत्त्वाचा निर्णय आला आहे. बऱ्याच दिवसांपासून राजकीय जाणकारांपासून सगळ्यांचाच या निर्णयाकडे लक्ष लागलं होतं. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल निर्णय दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? हे उत्तर मिळाल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल आहे. यापुढे अजित पवार गट अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाने अर्ज करायला सांगितला आहे. शिवसेनेच्या बाबतीत निवडणूक आयोगाने जो निकाल दिला होता, तसाच निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. “हा अपेक्षित निर्णय आहे, कारण मागील अनेक वर्षात सातत्याने निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली, समाजवादी पार्टी संदर्भात जेव्हा वाद उभा राहिला होता किंवा इतर पाच प्रकरणात इलेक्शन कमिशनची सातत्याने हीच भूमिका राहिली आहे” अस देवेंद्र फडणवीस म्हणाले. “बहुमताने जो निर्णय घेतला जातो तो निर्णय लोकशाहीत महत्वाचा असतो” असं ते म्हणाले.
‘वेळोवेळी पार्टीचे संविधान कसं होत?’
“पक्षाचे संविधान आहे. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या सगळ्या गोष्टींचा विचार निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे. मी अजित पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो. अपेक्षा आहे महाराष्ट्र सरकार त्यांच्या नेतृत्वात उत्तम काम करेल” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “बहुमताला महत्व आहेच, केवळ बहुमताच्या आधारावर निर्णय झाला नाही, तर इतर सर्व बाबीचा विचार झाला. वेळोवेळी पार्टीचे संविधान कसं होत? निवडणुका झाल्या की नाही? आता पक्ष कोणाचा आहे? याचा विचार झाला आहे” असं देवेद्र फडणवीस म्हणाले.
“2019 मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला, त्यांना लोकशाही काय असते हे समजले आहे. लोकशाहीने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. चपराक वैगेरे मी म्हणत नाही” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.