मला देशाच्या नाही, राज्याच्या राजकारणात रस : एकनाथ खडसे
"मला देशाच्या नाही तर राज्याच्या राजकारणातच रस आहे", असं स्पष्टीकरण भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे (BJP leader Eknath Khadse) यांनी दिलं आहे.
मुंबई : “मला देशाच्या नाही तर राज्याच्या राजकारणातच रस आहे”, असं स्पष्टीकरण भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे (BJP leader Eknath Khadse) यांनी दिलं आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली. या यादीत भाजपकडून एकनाथ खडसे यांना उमेदवारी देऊन त्यांची मनधरणी केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, दुसऱ्या यादीतही एकनाथ खडसे यांचं नाव आलेलं नाही. यावर एकनाथ (BJP leader Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मला देशाच्या नाही तर राज्याच्या राजकारणातच रस आहे. मी राज्याच्या राजकारणात कायमच सक्रीय होतो आणि आजही आहे. मी कधीही राज्यसभेचा दावेदार नव्हतो. ही गोष्ट खरी आहे की, काही जणांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती की मला ही जागा मिळावी. मात्र, यामुळे कसलाही अपेक्षाभंग झालेला नाही. कारण मी राज्यसभेचा दावा केलाच नव्हता. याशिवाय एका घरात दोन खासदार ही आमच्या पक्षाची संस्कृती नाही”, असं स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिलं.
पहिल्या यादीत उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना उमेदवारी
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी उमेदवार (Bhagwat Karad BJP Rajya sabha candidate) यादी जाहीर केली आहे. त्याआधी पहिल्या यादीत उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर आज भाजपने दुसऱ्या यादीत भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपने संजय काकडे यांचा पत्ता कट केल्याचं दिसून येत आहे. याशिवाय ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही तिकीट दिलेलं नाही. (Bhagwat Karad BJP Rajya sabha candidate)
राज्यसभेच्या सात जागांसाठी 26 मार्चला निवडणूक
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवार 13 मार्च आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार, तर भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी एक जागा लढणार असल्याचं बोललं जात होतं.
महाराष्ट्रातील भाजपचे उमेदवार
भाजपने पहिल्या यादीत महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आता भागवत कराड यांनाही उमेदवारी देऊन 7 पैकी 3 जागांवर दावा केला आहे.
उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांनी आपला राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला. महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यामुळे 26 मार्चला राज्यसभेच्या या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार याविषयी अनेक नावांची चर्चा होती. यात भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, माजी खासदार उदयनराजे भोसले या तिघांची चर्चा होती. मात्र, उमेदवारांच्या घोषणेनंतर एकनाथ खडसे यांना स्थान मिळाले नसल्याचं दिसत आहे.
संबंधित बातमी : भाजपचे राज्यसभेचे उमेदवार जाहीर, महाराष्ट्रातील दोन नावांवर शिक्कामोर्तब