Harshvardhan Patil join sharad pawar ncp: भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शुक्रवारी जोरदार भाषण केले. त्या भाषणातून त्यांनी तुतारी फुंकण्याची भाषा केली. तसेच कार्यकर्त्यांना विचारुन भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी राजकीय अपेक्षा काही करु नये, असे सांगत कार्यकर्त्यांना सल्ल्याच्या चार गोष्टीही सांगितल्या. आता आपण कोणावर टीका करु नये. कोणाला काही बोलू नये. सोशल मीडियावर काही टीका करु नका. मागील दहा वर्षांत जो त्रास झाला आहे, तो संपवण्यासाठी आता निर्णय घेऊ या, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले.
इंदापूर तालुका स्वाभिमानी तालुका आहे. अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारा तालुका आहे. आपल्याला आज अंतिम निर्णय घ्यायचा आहे, असे सांगत कार्यकर्त्यांना भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जायाचे का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी हो सांगितले. त्यानंतर आपण आता पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीत प्रवेशाची घोषणा करत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक संदर्भात शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. तालुक्यातील बऱ्याच लोकांचा तुम्ही विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह आहे असे पवार साहेब म्हणाले. याआधी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाली. त्यावेळी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आग्रह मी मोडू शकत नाही, असे मी त्यांना सांगितले आणि भाजप सोडण्याचा निर्णय त्यांना सांगितला. तालुक्यातील जनतेला काय वाटते त्याचा आदर मी करणार आहे. त्यावर जो निर्णय घ्यायचा तो घ्या, असे फडणवीस म्हणाले.त्यानंतर मी पवार साहेबांना भेटलो.
2019 ची निवडणूक आपण जिंकता जिंकता हरलो. 2014 चा पराभवाची खदखद आहे. आपल्याला काय त्रास सहन करावा लागला हे आपण पाहिले. आता आपल्याला कुणाविषयी वाईट बोलायचे नाही. आपल्याला संयम पाळायला आहे. पवार साहेबांचे आणि आपले व्यक्तिगत संबंध आहेत. कुणावर टीका करू नका. आपण सुसंस्कृत आहोत. येत्या काळात इंदापूर तालुक्याचा राजकीय वनवास संपल्याशिवय राहणार नाही. शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणे हा आपला रोल. आता तुमच्या आणि जनतेची इच्छेनुसार पक्ष प्रवेश करणार आहे.