महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा एक मोठं नाटक : भाजप खासदार अनंतकुमार हेगडे
"महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा हे केवळ एक मोठं नाटक होतं", असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलं आहे (Anantkumar Hegde on Freedom Struggle).
बंगळुरु : “महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा हे केवळ एक मोठं नाटक होतं”, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलं आहे (Anantkumar Hegde on Freedom Struggle). यावेळी हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्या महात्मा उपाधीवरही प्रश्न उपस्थित केले. अशा लोकांना महात्मा कसं म्हटलं जाऊ शकतं? असा प्रश्न हेगडे यांनी विचारला. ते बंगळुरुमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते (Anantkumar Hegde on Freedom Struggle). त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका होत आहे.
अनंतकुमार हेगडे म्हणाले, “संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याची चळवळ ब्रिटिशांच्या परवानगीने आणि पाठिंब्याने सुरु होती. स्वातंत्र्य लढ्यातील एकाही कथित नेत्याला ब्रिटिशांनी एकदाही मारलं नाही. त्यांची स्वातंत्र्य चळवळ एक मोठं नाटक होती. त्यांची संपूर्ण चळवळ खरा संघर्ष नव्हती, तर ब्रिटिशांच्या परवानगीने केलेली ‘तडजोड स्वातंत्र्य चळवळ’ होती.”
महात्मा गांधींचा सत्याग्रह आणि त्यांचं उपोषण हे देखील नाटकच असल्याचा गंभीर आरोप हेगडे यांनी केला आहे. जे लोक काँग्रेसला पाठिंबा देत आहेत ते म्हणतात की आमरण उपोषणामुळे आणि सत्याग्रहामुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं. मात्र हे खरं नाही. ब्रिटीश सत्याग्रहामुळे भारत सोडून गेले नाही. ब्रिटिशांनी निराशेतून भारताला स्वातंत्र्य दिलं. जेव्हा मी इतिहास वाचतो तेव्हा माझं शरिरातील रक्त खवळतं. आपल्या देशात कसे लोक महात्मा झाले आहेत, असंही हेगडे म्हणाले.
भाजप खा. @AnantkumarH यांचे वक्तव्य निषेधार्ह व त्यांची बौद्धीक दिवाळखोरी दर्शवणारे आहे. ब्रिटिशांची दलाली करून स्वातंत्र्यलढ्याला विरोध करणाऱ्यांना स्वातंत्र्यलढा नाटक वाटू शकतो यांच्या पूर्वजांनीही ब्रिटिशांशी हातमिळवून स्वातंत्र्यलढ्याला कायम विरोधच केला, हे भाजपचे खरे रूप आहे https://t.co/KmeAZuELil
— Balasaheb Thorat (@bb_thorat) February 3, 2020
अनंतकुमार हेगडे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून टीका होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हेगडे याचं हे वक्तव्य बौद्धिक दिवाळखोरी असल्याचं म्हटलं आहे. तसेच ब्रिटिशांची दलाली करुन स्वातंत्र्यलढ्याला विरोध करणाऱ्यांना स्वातंत्र्यलढा नाटक वाटू शकतो, असं प्रत्युत्तर दिलं आहे.
ब्रिटिशांची दलाली करणाऱ्या संघाच्या चेल्यांकडून हेच अपेक्षित आहे.#भाजपा गोडसेवादी आहे हे स्पष्टच आहे. मोदींनी गांधींचे नाव घेणे हेच फार मोठे नाटक आहे. ते आता प्रज्ञा ठाकूरप्रमाणे हेगडेलाही माफ करणार नाहीत. मोदींनी हा मुखवटा काढून गोडसेवादी विखारी चेहरा देशासमोर आणावा. जाहीर निषेध https://t.co/6kHtVnV2LK
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 3, 2020
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील अनंतकुमार हेगडेंच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. पंतप्रधान आताही प्रज्ञा ठाकूरप्रमाणे हेगडेंनाही माफ करणार नाहीत. मोदींचा त्याचा हा विखारी चेहरा देशासमोर आणावा, असं मत व्यक्त केलं.
दरम्यान, भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांचं हे पहिलंच वादग्रस्त वक्तव्य नाही. त्यांनी याआधी अनेकदा अशी वक्तव्यं दिली आहेत.
अनंतकुमार हेगडेंची वादग्रस्त वक्तव्यं
- “आम्ही संविधानात बदल करण्यासाठी सत्तेत आलो आहोत आणि आगामी काळात आम्ही संविधानात बदल करु.” – (डिसेंबर 2017 मध्ये कर्नाटकमधील कोप्पाल जिल्ह्यातील एका कार्यक्रमात)
- “सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाला विरोध करणाऱ्या आंदोलनात केरळ सरकारकडून आंदोलकांची हाताळणी दिवसाढवळ्या हिंदूंच्या बलात्कारासारखी आहे. – (2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर दिलेलं वक्तव्य)
- हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी इतर धर्मातील जे कुणी हिंदू मुलींना हात लावतील त्यांचे हात छाटून टाकावे आणि इतिहास घडवावा.” – (जानेवारी 2019)
- “ताजमहाल हे शंकराचं मंदिर होतं. त्याचं खरं नाव तेजो महाल होतं. ते राजा परमातीर्थ यांनी बांधलं होतं.” – (जानेवारी 2019)
- “आपण असंच झोपून राहिलो तर आपल्या घरांनाही मशीद म्हटलं जाईल. भविष्यात भगवान राम ‘जहापनाह’ आणि सीता ‘बिवी’ होईल.”
- “नथुराम गोडसे यांना देशभक्त म्हणणं चुकीचं नाही. यासाठी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी माफी मागण्याी गरज नाही.आता नाही तर मग कधी बोलणार? यावर भर देऊन बोललं पाहिजे. 7 दशकांनंतर नवी पिढी यावर बोलते आहे याचा आनंद आहे. या चर्चेनं नथुरामांना आनंद झाला असेल.” – (मार्च 2019)
- “काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा जन्म ख्रिश्चन आणि मुस्लीम यांच्या संकरातून झाला आहे. ते ब्राम्हण कसे होऊ शकतात?” – (मार्च 2019)
- “मुख्यमंत्र्यांकडे जवळपास 40 हजार कोटी रुपयांची केंद्राचा निधी होता. जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेत आले असते, तर त्यांनी या 40 हजार कोटी रुपयांचा दुरुपयोग केला असता. त्यामुळेच फडणवीसांनी 80 तास मुख्यमंत्रिपदावर येऊन हे नाटक केलं आणि 15 तासात त्यांनी केंद्राचा हा निधी परत पाठवला” – (डिसेंबर 2019)
संबंधित बातम्या:
भाजप खासदाराचा गौप्यस्फोट, फडणवीसांची शपथ हा पूर्वनियोजित कट, 80 तासात 40 हजार कोटी परत पाठवले
फडणवीसांकडून महाराष्ट्राशी गद्दारी, केंद्राकडे 40 हजार कोटी वळवल्याच्या दाव्यानंतर संजय राऊत भडकले
“40 हजार कोटी परत पाठवले असतील, तर फडणवीसांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही”
अनंतकुमार हेगडेंच्या आरोपाची चौकशी व्हावी, विनायक राऊत यांची लोकसभेत मागणी
संबंधित व्हिडीओ: