‘नांदायचं असेल, मंगळसूत्र घातलं असेल तर त्याचं पावित्र्य राखा’, नारायण राणे यांनी उदय सामंत यांना सुनावलं

| Updated on: Jan 03, 2024 | 10:18 PM

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावरुन भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. उदय सामंत यांनी या मतदारसंघावर दावा केला होता. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या मतदारसंघासाठी इच्छूक आहेत. याच मुद्द्यावरु नारायण राणे यांनी उदय सामंत यांना सुनावलं आहे.

नांदायचं असेल, मंगळसूत्र घातलं असेल तर त्याचं पावित्र्य राखा, नारायण राणे यांनी उदय सामंत यांना सुनावलं
Follow us on

मुंबई | 3 जानेवारी 2024 : लोकसभेच्या निवडणुकीचं बिगूल वाजण्याआधीच सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर दावा केला जातोय. या मतदारसंघासाठी दोन्ही बाजूने रस्सीखेच केली जात आहे. मंत्री उदय सामंत यांनी या मतदारसंघावर दावा केलाय. तसेच मंत्री दीपक केसरकर यांनीदेखील याबाबत वक्तव्य केलं आहे. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे या मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. तर भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव माजी खासदार निलेश राणे इच्छूक असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी या मतदारसंघात तयारीदेखील सुरु केली आहे. पण शिवसेनेकडून मतदारसंघावर दावा करण्यात आल्याने भाजपकडून नारायण राणे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. त्यांनी शिवसेना नेते उदय सामंत यांना युतीचं पावित्र्य राखण्याचं आवाहन केलं आहे.

“उदय सामंत बोलतील तसंच होईल असं सांगता येत नाही. आम्ही ओरिजनल आहोत. कुठूनही आलो असलो तरी भाजपमध्ये आहोत. सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघावर आमचा दावा सुरूच आहे. त्यामुळे उदय सामंत यांनी भाष्य करू नये. कोण उमेदवार आहे हे आमचा पक्ष ठरवेल. नांदायच असेल मंगळसूत्र घातलं असेल तर त्याचं (युतीच) पावित्र्य राखलं पाहिजे”, असं नारायण राणे म्हणाले.

महानंदा डेअरीच्या बातमीवर राणेंचं स्पष्टीकरण

यावेळी नारायण राणे यांनी महानंदा डेअरीच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया दिली. “महानंदा डेअरी एनडीबी डेअरीने चालवायला घ्यावी, अशी विनंती केली आहे. प्रकल्प जाणार नाही हाताळण्याचा काम एनडीबी करणार आहे. महानंदा डेअरीतील कामगारांना सहा महिने पगार मिळाला नाही. त्यावर कोण बोलत नाहीत”, असं नारायण राणे म्हणाले.

‘आदित्य ठाकरेंचे वडील मुख्यमंत्री असताना…’

“कोकण रेल्वेवर 6000 कोटींचं कर्ज आहे. विकासाला एक पैसा नाही. पगार जात नाहीत. कोकण रेल्वे भारतीय रेल्वेशी एकत्रित करावी, अशी मागणी मी संबंधित मंत्र्यांजवळ केली आहे”, अशी देखील माहिती नारायण राणे यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “आदित्य ठाकरेंचे वडील मुख्यमंत्री असताना रेसकोर्सच्या जमीनीची कोणी मागणी केली होती ते मला विचारा. हेच ठाकरे लोक प्रयत्नशील होते. काय असेल ते स्पष्ट बोल. महानगरपालिका असताना काय केले तिथे?”, असा नारायण राणेंनी केला.

‘उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिल्याने सुटणारा प्रश्न सुटणार नाही’

अंगणावडी सेविकांनी आज मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन केलं. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात गेले. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. यावरुन नारायण राणे यांनी टीका केली. “उद्धव ठाकरेंनी पाठिंबा देऊन काय होणार आहे. उलट सुटणारा प्रश्न सुटणार नाही. त्याने अपशकुन करू नये. त्याला कोण विचारत नाही. डुबणाऱ्या व्यक्तीने कोणाला पाठिंबा दिला तो मेला समजा”, असा टोला नारायण राणेंनी लगावला.