Chhagan Bhujbal : ‘छगन भुजबळांना आवरा’, 4 जूनच्या निकालाआधीच महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर, VIDEO
Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच महायुतीमधील मतभेद समोर येऊ लागले आहेत. काल छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना एक मागणी केली. त्याला आता भाजपा नेत्याने प्रत्त्युतर दिलं आहे. यातून महायुतीमधील विसंवाद दिसू लागला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी काल पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना एक वक्तव्य केलं होतं. त्यावरुन आता महायुतीमधील विसंवादाचे सूर समोर येऊ लागले आहेत. देशात आता फक्त लोकसभा निवडणुकीसाठी एका टप्प्याच मतदान बाकी आहे. त्यानंतर 4 जूनला निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. त्याआधीच महायुतीमधील मतभेद दिसू लागले आहेत. काल पक्षाच्या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “आपण महायुतीमध्ये आलो, तेव्हा त्यांनी 80-90 जागा देण्याचा शब्द दिलेला. विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळाला पाहिजे” “लोकसभेसारखी विधानसभेला खटपट नको, आम्हाला एवढ्या जागा हव्या हे त्यांना सांगाव लागेल. 80-90 जागा मिळाल्या, तर 50-60 निवडून येणार. तुमचे 50 आहेत, मग 50 घ्या, असं होता कामा नये. त्यामुळे आताच सांगून टाका आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे” असं छगन भुजबळ म्हणाले.
त्यावर आता कोकणातील भाजपाचे नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो, तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं?’ असं म्हटलं आहे. “मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही. आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही” असं निलेश राणे म्हणाले. ‘भाषा बोलत असेल तर सहन होत नाही’
“आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठ सूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे” असं निलेश राणे म्हणाले. अजित पवार यांनी सुद्धा काल याच मेळाव्यात बोलताना केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “या निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. ठाकरेंपासून लांब असणारा अल्पसंख्यांक समाज यंदा ठाकरे गटासोबत गेला” असं अजित पवार म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.