मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या खळबळजनक लेटरबॉम्बनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमधून नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आगामी काळात महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होण्याचे सूतोवाच केले आहे. महाराष्ट्रात “भगव्या” च राज्य येते आहे. हीच ती वेळ !!!, असा सूचक मजकूर या ट्विटमध्ये आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात खरंच राजकीय भूकंप होणार का, याविषयी आता चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. (BJP Leader Nitesh Rane tweet after Shiv Sena MLA Pratap Sarnaik letter to CM Uddhav Thackeray)
प्रताप सरनाईक यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आपल्या मनातील भावना बोलून दाखविली. यामध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्यासारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असे प्रताप सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्रात “भगव्या” च राज्य येते आहे..
हीच ती वेळ !!!
— nitesh rane (@NiteshNRane) June 20, 2021
आपण गेले दीड वर्षे राज्याची धुरा यशस्वी व समर्थपणे सांभाळत आहात. कोरोना सारख्या महासंकटाला आपण ज्या पद्धतीने तोंड दिले, या संकटाचा मुकाबला केला याबद्दल प्रत्येक जण आपल्या नेतृत्वाचे कौतुक करत आहे. महाराष्ट्राची जनताच नाही तर देशात विदेशातही ‘महाराष्ट्र मॉडेल’ व आपल्या कार्यशैलीचे खूप कौतुक होत आहे. याचा आपले कार्यकर्ते म्हणून आम्हाला अभिमान आहे. ”करोना” ला रोखण्यासाठी राज्यात आपण ज्या प्रभावी उपाययोजना केल्या त्याची दखल देशात विदेशात घेतली गेली आहे. आपली अविरत मेहनत, दूरदृष्टी व एकूणच नियोजन यामुळे हे संकट कमी झाले. कोविडच्या पहिल्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर दुसरी लाट येणार हे अपेक्षीत धरून त्याआधीच आरोग्य सुविधा आपण वाढवल्या. मोठमोठी कोविड सेंटर उभारलीत. प्रयोगशाळा, ऑक्सिजन प्लांट व इतर आरोग्य सुविधा पुरविण्यात महाराष्ट्र पुढे राहिला. कोरोनामुळे जनजीवन ठप्प व विस्कळीत झालेले असताना आपल्या महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर नेण्याचे काम आपण सुरु ठेवले. नुकतेच जे चक्रीवादळ आले त्या आपण सांत्वन केले व स्वतः जाऊन त्यांना मदत पोहोचवली, आधार दिला. हे करीत असताना मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रोची कामे, उड्डाणपूल कोस्टल रोड व इतर सर्वच मोठ्या कामांसाठी आपण चांगले प्रयत्न करीत आहेत. दिवसरात्र आपण कामात झोकून दिले आहे. मुंबईच्या पर्यावरण रक्षणासाठी “आरेची 812 एकर जमीन वनखात्याला मिळवून देत पर्यावरण रक्षण करण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. अनेक मोठे निर्णय आपण घेतले आहेत. आपले त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन साहेब !
मराठा व ओबीसी आरक्षण तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या प्रश्नासंदर्भात जून रोजी आपण नवी दिल्लीत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्याबाबत पुढाकार घेतला त्याबद्दलही मनःपूर्वक अभिनंदन. त्या बैठकीनंतर आपण मा. मोदीजी यांच्यासोबत अर्धा तास खासगीत चर्चा केल्याचे वृत्त दाखवले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात शिवसेना-भाजप तसेच सर्व पक्षीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. दीड वर्षांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप महायुती म्हणून आपण एकत्र लढल्यानंतर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावरून आपली युती तुटली. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांची महाविकास आघाडी तयार झाली व राज्यात सत्ता स्थापन झाली. या अभूतपूर्व परिस्थितीत शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद मिळवत आपली ताकद, नेतृत्वगुण, कणखरपणा, राजकीय दूरदृष्टी आपण भाजपला व राज्याला देशाला दाखवून दिली. परंतु गेल्या दीड वर्षात कोरोना संकटाने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. आपल्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहात. त्याचमुळे देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री” म्हणून आपण पहिल्या क्रमांकावर आहात.
एकीकडे आपण राजकारण बाजूला ठेऊन फक्त आणि फक्त आपल्या मुख्यमंत्री पदाला प्रामाणिकपणे न्याय देत आहात. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना वाटत आहे. त्यात काँग्रेस पक्ष “एकला चलो रे” ची भूमिका घेत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते कार्यकर्ते फोडत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच महाविकास आघाडीतील काही मंत्री व काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करीत आहेत हेही आपल्या निदर्शनास आणून देत आहे.
त्याचबरोबर गेल्या दीड वर्षात आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी मी चर्चा केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे झटपट होतात, मात्र आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत” अशी काही आमदारांची अंतर्गत नाराजी आहे. एका विशिष्ट परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. भाजपशी युती तोडून शिवसेना पक्षाने, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी” स्थापन केली की काय ? अशी चर्चा आहे.
साहेब, आमचा तुमच्या नेतृत्वावर अढळ विश्वास आहे. कोरोना काळात आपण प्रचंड मेहनत घेऊन कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्याचा संभाळ केला आहे. त्याबद्दल आपले खरोखर कौतुक करावे तितके कमी आहे. महाराष्ट्र राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविणार हा वंदनीय शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेबांना दिलेला शब्द व त्यांना दिलेले वचन पूर्ण झालेले आहे. आपण या पदाला न्याय दिला आहे व देत आहात. पण या परिस्थितीतही जे राजकारण सुरु आहे त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे.
कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे “माजी खासदार” झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरु आहे त्यालाही कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबियांवर सुध्दा सतत आघात होत आहेत, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल.
संबंधित बातम्या:
काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करतेय, भाजपशी जुळवून घ्या; प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब
प्रताप सरनाईक यांचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं; वाचा संपूर्ण पत्रं जसच्या तसं
‘केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे ‘माजी खासदार’ झालेल्या नेत्याकडून आमची बदनामी’
(BJP Leader Nitesh Rane tweet after Shiv Sena MLA Pratap Sarnaik letter to CM Uddhav Thackeray)