किमान 25 मतदारसंघांवर थेट प्रभाव, पण विधानपरिषदेसाठी संधी नाही, पंकजांच्या नाराजीचा भाजपला फटका बसणार ?
मी फाटक्या माणसाच्या पायावर डोके ठेवेन पण पदासाठी कुणापुढेही हात पसरणार नाही असं वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्या या नाराजीवर भाजपला फटका बसेल का असेदेखील विचारले जात आहे.
मुंबई : भाजपच्या फायरब्रँड नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा अस्वस्थ असल्याचं चित्र निर्माण झाले आहे. कारण बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड या गावात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी मी फाटक्या माणसाच्या पायावर डोके ठेवेन पण पदासाठी कुणापुढेही हात पसरणार नाही असं वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्या या नाराजीवर भाजपला फटका बसेल का असेदेखील विचारले जात आहे.
भागवत कराड यांना संधी, पंकजा नाराजी पुन्हा समोर
भाजपच्या फायरब्रँड नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांची ओळख आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांची ही नाराजी अनेक वेळेला समोर सुद्धा आलेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात भागवत कराड यांचा समावेश झाल्यानंतर असंख्य कार्यकर्ते पंकजा मुंडे यांच्या घरी जमले होते. त्यावेळी झालेल्या भाषणामध्येसुद्धा पंकजा मुंडे यांची नाराजी दिसली होती. मात्र त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्यांनी शिष्टाई करत पंकजा मुंडे यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्यातील खदखद कायम असल्याचं चित्र दिसतंय.
पंकजा म्हणाल्या पदासाठी कुणापुढेही हात पसरणार नाही
बंजारा समाजातील माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या गौरव कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे यांनी बोलत असताना उपस्थित जनसमुदायासमोर मी फाटक्या माणसांच्या पायावरती डोकं ठेवेन मात्र पदासाठी कुणापुढेही हात पसरणार नाही, असं वक्तव्य केलं. पंकजा मुंडे यांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली खदखद पुन्हा एकदा समोर आल्याचे बोलले जात आहे
चंद्रशेखर बावनकुले यांना संधी
पंकजा मुंडे या विधानसभेत पराभूत झाल्यानंतर त्यांचे कुठेही पुनर्वसन झालेले नाही. आता विधानपरिषदेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेत्यांना संधी देण्यात आली आहे. इतकच नाही तर भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेखर बावनकुळे यांचेसुद्धा भाजपकडून पुनर्वसन केले जातेय. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाची साधी चर्चासुद्धा झालेली नाही. याच कारणामुळे पंकजा यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो असा कयास बांधला जात आहे.
भाजपला फटका बसणार ?
पंकजा मुंडे या भाजपच्या मोठ्या नेत्या आहेत. महाराष्ट्रातल्या किमान 25 मतदारसंघांवर पंकजा यांचा थेट प्रभाव आहे. मात्र त्यांना सध्या पक्षांमध्ये न्याय मिळत नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते कमालीचे नाराज आहेत. पंकजा मुंडे यांच्या बोलण्यातून त्या नाराज असल्याचं अनेकदा स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला याचा फकटा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. भाजपला हा फटका नेमका कुठे आणि कसा बसणार हे आगामी काळातच स्पष्ट होईल.
इतर बातम्या :
आघाडी म्हणजे ‘वाह री सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल’; सुधीर मुनगंटीवारांची घणाघाती टीका
अनिल परबांना केबल कनेक्शन देण्याइतकं एसटीचं काम सोप्पं वाटतं का?; राधाकृष्ण विखे-पाटलांची खोचक टीका
यशोमती ताई फिरल्याचे चालते, मग विरोधी पक्षनेत्यांचे फिरणे भडकावणे कसे; भाजप नेते शेलारांचा सवाल