मंत्री प्राजक्त तनपुरेंच्या दाव्यानंतर कर्डिलेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा, शिवाजी कर्डिले म्हणतात…
एकनाथ खडसेंनंतर आता भाजपचे नेते आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जिल्ह्यात जोरदार चर्चा होती. यावर आता स्वतः शिवाजी कर्डिले यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अहमदनगरमधील भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादीत येणार असल्याचा दावा केला. यानंतर एकनाथ खडसेंनंतर आता भाजपचे नेते आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जिल्ह्यात जोरदार चर्चा होती. यावर आता स्वतः शिवाजी कर्डिले यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. “मला भाजप सोडून कुठल्याही पक्षात जायचं नाही. तसेच माझ्याशी कोणीही संपर्क केलेला नाही आणि त्याची मला गरजही नाही,” असं म्हणत शिवाजी कर्डिले यांनी आपल्या राष्ट्रावादी प्रवेशाची चर्चा फेटाळली आहे (BJP Leader Shivaji Kardile comment on gossips of his NCP joining in Ahmednagar).
शिवाजी कर्डिले म्हणाले, “राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी येणार असल्याचा दावा केला. मात्र तनपुरे यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही. कोणीही भाजपातून राष्ट्रवादीत जाणार नाही. मला भाजप सोडून कुठल्याही पक्षात जायचं नाही. तसेच माझ्याशी कोणीही संपर्क केलेला नाही आणि त्याची मला गरजही नाही.”
मला खोट्या गुन्ह्यात अडकवलं तेव्हा माझ्यासाठी खडसे नगरमध्ये आलेले : शिवाजी कर्डिले
“एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षात असताना ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी माझ्यावर एक संकट आलं होतं. त्यावेळी मला एका खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आले होते. तेव्हा माझ्यावरील अन्यायाच्या विरोधात न्याय देण्याची भूमिका बजावण्यासाठी एकनाथ खडसे नगरमध्ये आले होते. त्यामुळे त्यांचे आणि माझे जवळचे संबंध आहेत. असं असल्यानेच लोक माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा करत असतील. मात्र ज्यावेळी ते राष्ट्रवादीत गेले त्यावेळी हा विषय संपलाय,” असंही शिवाजी कर्डीले यांनी स्पष्ट केलं.
ठाकरे सरकार डिसेंबरपर्यंतच राहणार, त्यानंतर भाजप सत्तेवर येणार, कर्डिलेंचा दावा
महाविकास आघाडीचे सरकार डिसेंबरपर्यंत, तर डिसेंबरनंतर राज्यात भाजप सरकार येईल, असा दावा माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी केलाय. ते म्हणाले, “आता पुढचे 5 वर्षे तर सोडून द्या, हे 5 वर्षे देखील सरकार टिकेल की नाही हे महाराष्ट्रातील जनताच सांगेल. त्यामुळे त्याला कोणत्याही भविष्यकाराची गरज नाही. माझ्या माहितीप्रमाणे महाविकासआघाडीची सत्ता डिसेंबरपर्यंत टिकेल आणि डिसेंबर नंतर राज्यात भाजप सरकार येईल.”
संबंधित बातम्या :
ठाकरे सरकार डिसेंबरपर्यंतच राहणार, त्यानंतर भाजप सत्तेवर येणार, नगरच्या ‘किंगमेकर’चा दावा
विखेंवर कारवाई होईपर्यंत आमची नाराजी कायम : शिवाजी कर्डिले
नगरमधील पराभवाला विखे जबाबदार, भाजपच्या पराभूत उमेदवारांचा आरोप
BJP Leader Shivaji Kardile comment on gossips of his NCP joining in Ahmednagar