प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा मुद्दा, भाजप नेत्याचा शरद पवार आणि अजित पवारांबाबत मोठे दावे
"राष्ट्रवादीचा आधार असलेले अजितदादा आज त्यांच्यासोबत नाहीत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांनी अजितदादांना खूप दुखावलं, प्रचाराचा स्तर खाली गेला, म्हणून अजितदादा परत जाणार नाहीत", असा दावा भाजपच्या बड्या नेत्याने केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत जातील किंवा त्यातील काही पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावीर सडकून टीका केली. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतही महत्त्वाचा दावा केला. अजित पवार हे पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाणार नाहीत, असा देखील दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
“लोक माझे सांगती हे शरद पवारांचं आत्मचरित्र वाचलं तर त्यांचं राजकारण ताडजोडीचं आणि सत्तेच्या स्वार्थाचं राजकारण राहिलेलं आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधींवर टिप्पणी करताना त्यांनी 15 मे 1999 रोजी विदेशी मुळाचा मुद्दे घेत टीका केली होती. त्यांनतर संगमा आणि पवारांनी पक्ष काढला. पण काही महिन्यानंतर ते काँग्रेससोबत गेले. दिवंगत काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी म्हणाले होते की, सोनिया गांधी पवारांवर विश्वास ठेवत नव्हत्या. पवारांना आज हे म्हणायची गरज का लागली? त्यांना राष्ट्रवादीच्या भवितव्याची कल्पना आहे”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
“राष्ट्रवादीचा आधार असलेले अजितदादा आज त्यांच्यासोबत नाहीत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांनी अजितदादांना खूप दुखावलं, प्रचाराचा स्तर खाली गेला, म्हणून अजितदादा परत जाणार नाहीत. आताची शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे, शिवसैनिकांची नाही, आताची राष्ट्रवादी पवारांच्या नावाने आहे. इतिहासात कधी नावाने पक्ष नव्हते, हे पक्ष नावाचे झालेत कार्यकर्त्यांचे राहिले नाहीत”, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
‘पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, निवडणुकीनंतर राज्यातील 2 पक्ष संपतील’
“आता प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत जातील असं म्हणावं लागलं. राजकारणात समविचारी पक्ष असले तरी त्यांचं विलीनीकरण होत नाही. आज जो विलिनीकरणचा विषय आलाय, तो भवितव्याच्या अनुषंगाने आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, या निवडणुकीनंतर राज्यातील 2 पक्ष संपतील. याचा आजच्या पवारांच्या विधानाशी संदर्भ आहे. अशा प्रकारचे मत मांडून वातावरण बघायचा ते प्रयत्न करत आहेत”, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
“आम्हाला 2014 ला बहुमत नव्हतं, तेव्हा यांनी न मागता पाठिंबा दिला होता. भाजपसोबत जाण्याचा निर्णय तेव्हा कुणी घेतला होता? लोक माझे सांगातीमधून पवारांचं राजकारण काय आहे ते समजतं. पवारांनी आपल्या भावाचा पराभव केला होता, आज एक भाऊ आपल्या बहिणीचा पराभव करेल”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.