पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी, भाजप नेत्याचा मोठा दावा
Devendra Fadanvis and Ajit Pawar Morning Swearing : पहाटेच्या शपथविधीबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा दावा केला आहे. हा शपथविधी म्हणजे एक राजकीय ऑपरेशन होते. उद्धव ठाकरे यांनी धडा शिकवण्यासाठी ते ऑपरेशन होते.
मुंबई : राज्यात अधूनमधून २०१९ मधील पहाटेच्या शपथविधीवरून विविध दावे केले जातात. आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी घेतलेल्या शपथविधीसंदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा दावा केला आहे. यामुळे शपथविधीच्या चर्चांमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. यापूर्वी पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांचाच हात होता, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. त्यावेळी ती चर्चा चांगलीच रंगली होती. आता सुधीर मुनगंटीवार यांनी हा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी होता, असे सांगितले आहे. यामुळे राजकीय चर्चा पुन्हा सुरु होणार आहे.
काय म्हणाले मुनगंटीवार
2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी जनादेशाचा अवमान केला. त्यांनी निवडणूक आमच्यासोबत लढवली. परंतु त्यानंतर विश्वासघात केला. यामुळे हे एक राजकीय ऑपरेशन होते. एक गमिनी कावा होता. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता, असा दावा मुनगंटीवार यांनी केला.
अजित पवार तयार झाले
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी अजित पवार तयार झाले. आम्हालाही उद्धव ठाकरे यांना धडा शिकवायचा होता. कारण त्यांनी शिवसैनिकांचा अवमान केला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अवमान केला होता. शिवसैनिकास सोडून स्वत: मुख्यमंत्री झाले होते. मग अजित पवार सोबत येण्यास तयार झाले. यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे, असे समजून तो शपथविधी झाला, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. अजित पवार सोबत आले तेव्हा कोणतीही अट टाकलेली नव्हती. ते उपमुख्यमंत्री होणार होते. त्यामुळेच सरकार आले, असे त्यांनी सांगितले.
23 नोव्हेंबर २०१९ ला पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे भाजपनं मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळला नाही म्हणत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत संधान साधून होती. तर शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नाही, यावर भाजप नेते ठाम होते. यामुळे भाजप व अजित पवार गट यांचा शपथविधी झाला होता.