‘मला ग्रीन टीमधून गुंगीचं औषध दिलं’, वादग्रस्त व्हिडीओबाबत श्रीकांत देशमुख यांची प्रतिक्रिया; राजकीय कटाचा आरोप
संबंधित महिलेने गुंगीचं औषध दिल्याचा आरोप देशमुख यांनी केलाय. एका महिलेने हॉटेलच्या रुममध्ये फोनवर एक व्हिडीओ शूट केलाय. त्यात तिने देशमुख यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला. या महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सोलापूर : भाजपचे सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर भाजपने देशमुख यांना राजीनामा (Resignation) देण्यास सांगितलं, त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी तो राजीनामा स्वीकारल्याचंही ट्विटरवरुन सांगितलं. या सर्व प्रकरानंतर देशमुख यांनी आपली बाजू माध्यमांसमोर मांडलीय. संबंधित महिलेने गुंगीचं औषध दिल्याचा आरोप देशमुख यांनी केलाय. एका महिलेने हॉटेलच्या रुममध्ये फोनवर एक व्हिडीओ शूट केलाय. त्यात तिने देशमुख यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला. या महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
‘या प्रकारात राजकीय विरोधकांच्या सहभागाची शक्यता’
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि पक्षाने राजीनामा घेतल्यानंतर आता श्रीकांत देशमुख यांनी आपली बाजू मांडलीय. संबंधित महिलेनं ग्रीन टीमध्ये गुंगीचं औषध टाकून माझ्यासोबत आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला. त्यानंतर चारित्र्य हननाचा प्रयत्न केला. या प्रकारात राजकीय विरोधकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. तसंच संबंधित महिलेविरोधात ओशिवरा अंधेरी पोलीस ठाण्यात हनी ट्रपिंग आणि खंडणीचा गुन्हा दाखल केलाय, असं देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.
भाजपा सोलापूर (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष या पदाचा श्रीकांत देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष या नात्यानं हा राजीनामा मी स्वीकारला आहे. pic.twitter.com/KqnUuGFPBK
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 12, 2022
व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?
सोलापूर भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच एक तरुणी कॅमेरासमोर रडताना दिसतेय. त्यानंतर ती हॉटेलच्या रुममधील बेडकडे कॅमेरा नेते, तेव्हा तिथे एक व्यक्त बनियानवर बसलेला पाहायला मिळतो. तेव्हा तरुणी सांगते की, ‘ हा जो माणूस आहे, यानं मला फसवलं आहे. हा श्रीकांत देशमुख आहे. हा बायकोबरोबर संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय. लग्न करतोय हा’. तेवढ्यात तो तरुण बेडवरुन उठतो आणि त्या तरुणीकडे धाव घेत मोबाईल कॅमेरा बंद करण्याचा प्रयत्न करतो.
व्हिडीओ बंद करण्यासाठी जेव्हा ती व्यक्ती तरुणीकडे धाव घेतो. त्यावेळी ती महिला म्हणते की, ‘नाही, आता तू बघच. तुला नाही सोडणार. तू माझ्याशी का खोटं बोलला. का खोटं बोलला?’, असा प्रश्न ती तरुणी विचारते. साधारण 30 सेकंदाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.