भाजप नेत्याची काँग्रेस सोबत हातमिळवणी, शिर्डीत विखेंच्या सत्तेला पाहा कोणी लावला सुरूंग
शिर्डीत विखे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपच्याच नेत्याकडून विखे पाटील यांना शह मिळाला आहे.
मनोज गाडेकर, शिर्डी : महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सत्ता असलेल्या गणेशनगर साखर कारखाना निवडणुकीत भाजपच्या विवेक कोल्हे गटाने थोरातांच्या साथीने विखेंना शह दिलाय. 19 पैकी 18 जागेवर दणदणीत विजय मिळवत विखेंना मोठा धक्का देत थोरात – कोल्हे गटाने एकहाती सत्ता मिळवली आहे.
शिर्डी मतदारसंघात असलेल्या गणेशनगर साखर कारखान्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची गेल्या आठ वर्षापासून सत्ता आहे. यावेळी मात्र विखे पाटील यांच्या विरोधात भाजपच्या कोल्हे गटाने दंड थोपाटल्याने विखेंची मोठी दमछाक झाली.
ऐनवेळी कोल्हे गटाने काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा हात हातात घेतला आणि परिवर्तन मंडळाच्या माध्यमातून विखेंविरोधात रान पेटवले. त्याचा परिणाम असा झाला की 19 पैकी 18 जागा मतदारांनी कोल्हे – थोरात गटाच्या पारड्यात टाकल्या आहेत.
कोपरगाव मतदारसंघात असताना गणेशनगर साखर कारखान्यावर स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांची 37 वर्ष सत्ता होती मात्र नंतर शिर्डी मतदारसंघात समावेश झाल्यानंतर कोल्हेंनी कारखान्याकडे दुर्लक्ष केले होते.
पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवाला विखे पाटील जबाबदार असल्याची तक्रार कोल्हेंनी पक्षश्रेष्टींकडे केली होती. तेव्हापासून पक्षाअंतर्गत असलेला विखे आणि कोल्हेंचा विरोध गणेशनगर कारखान्याच्या निमित्ताने समोर आला आणि कोल्हेनी विधानसभेच्या पराभवाचा गणेशनगर साखर कारखान्यात वचपा काढला.
विखे पाटलांच्या मतदारसंघातील शिर्डी, राहाता, अस्तगाव आणि गणेशनगर परीसरातील मतदारांनी विरोधात मतदान करत विखे पाटलांना मोठा धक्का दिलाय. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विखे पाटलांची डोकेदुखी वाढणार आहे.
विखे पाटलांची चिंता वाढणार
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील अनेक गावात विरोधात झालेले मतदान विखे पाटलांची चिंता वाढवणारे ठरणार आहे तर आगामी विधानसभा , जिल्हा परिषद ,पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने विरोधकांच्या आशा पल्लवित करणारे ठरणार आहे हे मात्र नक्की.