भाजपच्या पहिल्या यादीत दोन विद्यमान खासदारांना डच्चू
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची नावं आहेत. या 16 जणांमध्ये 14 विद्यमान खासदार आणि 2 नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. भाजपने पहिल्या यादीत लातूरचे खासदार सुनील गायकवाड आणि अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांना डच्चू दिला आहे. लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांना डच्चू लातूरचे […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची नावं आहेत. या 16 जणांमध्ये 14 विद्यमान खासदार आणि 2 नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. भाजपने पहिल्या यादीत लातूरचे खासदार सुनील गायकवाड आणि अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांना डच्चू दिला आहे.
लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांना डच्चू
लातूरचे विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांना भाजपने यंदा डच्चू दिला आहे. सुनील गायकवाड यांच्या कामावर भाजपचे पक्षश्रेष्ठी नाराज होते, अशी चर्चा आहे. यातूनच त्यांच तिकीट कापलं गेल्याची चर्चा आहे. लातूरमधून जिल्हा परिषद सदस्य सुधाकर श्रंगारे यांना तिकीट दिलं आहे.
लातूरचे नवे उमेदवार सुधाकर श्रंगारे नेमके कोण आहेत?
जिल्हा परिषद सदस्य सुधाकर श्रंगारे यांना भाजपने लातूरमधून उमेदवारी जाहीर केली आहे. श्रंगारे हे व्यवसायाने कंत्राटदार आहेत. मुंबईत त्यांचा व्यवसाय आहे तर ते चाकूर तालुक्यातल्या वडवल येथून जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पक्षाकडे आग्रह धरला होता. विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांच्या बाबत भाजपातील कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
अहमदनगरमधून दिलीप गांधींऐवजी सुजय विखे
अहमदनगरचे विद्यमान भाजप खासदार दिलीप गांधी यांचं तिकीट अपेक्षेप्रमाणे भाजपने कापलं आहे. नगरमधून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यावर निश्चिती झाली आहे. खरेतर सुजय विखेंची उमेदवारी आधीच निश्चित मानली जात होती. त्यामुळे पर्यायाने दिलीप गांधी यांचं तिकीट कापलं जाणार आहे, हेही निश्चित होतं.
सुजय विखे यांनी काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सुजय विखेंच्या प्रवेशामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसला होता. कारण सुजय विखे हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आहेत.
आता नगरमध्ये आघाडीकडून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नगरमध्ये संग्राम जगताप विरुद्ध सुजय विखे असा सामना रंगणार आहे.
भाजपच्या पहिल्या यादीतील महाराष्ट्रातील उमेदवार :
- नागपूर – नितीन गडकरी
- नंदुरबार – हिना गावित
- धुळे – सुभाष भामरे
- रावेर – रक्षा खडसे
- अकोला – संजय धोत्रे
- वर्धा – रामदास तडस
- चिमूर-गडचिरोली – अशोक नेते
- जालना – रावसाहेब दानवे
- भिवंडी – कपिल पाटील
- उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी
- उत्तर मध्य मुंबई – पूनम महाजन
- नगर – सुजय विखे
- बीड – डॉ. प्रीतम मुंडे
- लातूर – सुधाकरराव श्रंगारे
- सांगली – संजयकाका पाटील
- चंद्रपूर – हंसराज अहीर