विदर्भ केसरीचा किताब जिंकणारा मल्ल, राजकारणातील ‘पहिलवान’, कोण आहेत रामदास तडस?

| Updated on: Sep 07, 2021 | 7:17 AM

MP Ramdas Tadas | महाविद्यालयात असताना रामदास तडस यांनी अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला होता. लग्न झाल्यानंतर घरगुती जबाबदाऱ्यांमुळे रामदास तडस काही काळ कुस्तीपासून दूर झाले. मात्र, त्यांनी कुस्तीचा ध्यास काही सोडला नाही.

विदर्भ केसरीचा किताब जिंकणारा मल्ल, राजकारणातील पहिलवान, कोण आहेत रामदास तडस?
रामदास तडस, भाजप खासदार
Follow us on

मुंबई: महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करणारे नेते म्हणून खासदार रामदास तडस यांच्याकडे पाहिले जाते. 2009 पर्यंत वर्धा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. हा मतदार संघ 12 वेळा काँग्रेसकडे होता, तर एकदा कम्युनिस्ट पार्टीचा उमेदवार विजयी झाला होता. भाजपला फक्त तीनवेळा या मतदारसंघात विजय मिळाला होता. मात्र, रामदास तडस यांच्या पक्षप्रवेशानंतर वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

कोण आहेत रामदास तडस?

रामदास तडस यांचा जन्म 1 एप्रिल 1953 रोजी विदर्भातील देवळी येथे झाला. त्यावेळी हा परिसर मध्य प्रदेशात मोडत होता. 1960 साली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर विदर्भाचा महाराष्ट्रात समावेश झाला. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने लहानपणासूनच रामदास तडस आपल्या वडिलांना शेतीच्या कामात मदत करत. शालेय वयातच त्यांना मैदानी खेळांची आवड होती. आयुष्यात नाव कमवायच्या हेतूने रामदास तडस यांनी कुस्तीचे धडे गिरवायला सुरुवात केली.

राज्यस्तरीय मल्ल, चारवेळा विदर्भ केसरीचा बहुमान

राजकारणात येण्यापूर्वी विदर्भासह महाराष्ट्रातील नावाजलेला मल्ल म्हणून रामदास तडस यांची ओळख होती. शालेय वयात त्यांनी कुस्तीच्या मैदानात प्रचंड घाम गाळला. रामदास तडस यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली तेव्हा विदर्भाचा समावेश महाराष्ट्रात झाला. मॅट्रिक झाल्यानंतर कुस्तीत कारकीर्द घडवण्याच्यादृष्टीने रामदास तडस नागपुरात दाखल झाले. आपल्या कौशल्याच्या जोरावर थोड्याच काळात रामदास तडस यांची नागपूर कुस्तीगीर संघात वर्णी लागली. त्यानंतर रामदास तडस यांनी नागपूर विद्यापीठाला कुस्तीत अनेक सुवर्णपदकं जिंकून दिली.

महाविद्यालयात असताना रामदास तडस यांनी अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला होता. लग्न झाल्यानंतर घरगुती जबाबदाऱ्यांमुळे रामदास तडस काही काळ कुस्तीपासून दूर झाले. मात्र, त्यांनी कुस्तीचा ध्यास काही सोडला नाही. याच ध्यासापोटी रामदास तडस यांनी 1976, 1978,1980 आणि 1982 मध्ये विदर्भ केसरीचा बहुमान पटकावला. राजकारणात आल्यानंतरही रामदास तडस यांनी कुस्तीच्या प्रसारासाठी अनेक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी वर्धा जिल्ह्यात अनेक उपक्रम राबविले.

रामदास तडस यांचा राजकीय प्रवास

विदर्भात एक प्रथितयश मल्ल म्हणून ओळख निर्माण केल्यानंतर रामदास तडस राजकारणाकडे वळले. 1983 मध्ये पूलगाव कृषी बाजार उत्पन्न समितीच्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर 1985 मध्ये रामदास तडस यांनी नवी आघाडी स्थापन करुन देवळी नगरपरिषदेची निवडणूक लढवली. यावेळी त्यांनी दिवंगत मोतीलाली कपूर यांचे तब्बल 35 वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आणले. तेव्हापासून देवळी नगरपरिषेदवर कायम रामदास तडस गटाचे वर्चस्व राहिले आहे.

नंतरच्या काळात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून ते विधानपरिषेदवर निवडूनही गेले होते. मात्र, 2009 मध्ये रामदास तडस यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपचे कमळ हातात धरले. त्यानंतर भाजपने त्यांना देवळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीही दिली होती. मात्र, त्यावेळी काँग्रेसच्या रणजित कांबळे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.

अखेर 2014 साली भाजपने त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. या निवडणुकीत मोदी लाटेमुळे रामदास तडस विजयी ठरले. मात्र, 2019 मध्ये रामदास तडस यांच्यासमोर काँग्रेसच्या चारुलता टोकस यांनी तगडे आव्हान निर्माण केले होते. रामदास तडस यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनी वर्ध्यात सभा घेतली होती. तर चारुलता टोकस यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही वर्ध्यात प्रचार केला होता. त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची झाली होती. अखेर या लढतीत रामदास तडस यांनी बाजी मारली होती.