राणेंमुळे भाजपची गोची? चंद्रकांत पाटील म्हणतात, राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही!
Chandrakant Patil | राणे साहेबांची त्यांची स्वत:ची एका कार्यपद्धती आहे, बोलण्याची स्टाईल आहे. रावसाहेब दानवेंची एक वेगळी स्टाईल आहे. त्यामधून एखादा आक्षेपार्ह शब्द आला असेल तर केंद्रीय मंत्र्याला थेट अटक होऊ शकते का?
पुणे: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाडमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजपची गोची होताना दिसत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना मी नारायण राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही, असे स्पष्ट केले. मात्र, नारायण राणे (Narayan Rane) यांच्या बोलण्याची शैली आक्रमकच आहे. त्यामुळे एखाद्या वक्तव्यावरुन लगेच त्यांना अटक करणे योग्य ठरणार नाही. अटक करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला समज द्यायला पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
राणे साहेबांची त्यांची स्वत:ची एका कार्यपद्धती आहे, बोलण्याची स्टाईल आहे. रावसाहेब दानवेंची एक वेगळी स्टाईल आहे. त्यामधून एखादा आक्षेपार्ह शब्द आला असेल तर केंद्रीय मंत्र्याला थेट अटक होऊ शकते का? त्यावर काही समज देणं, म्हणणं हा भाग आहे की नाही. गेल्या तीन दिवसांपासून खासदार विनायक राऊत हेदेखील नारायण राणे यांच्यावर टीका करतच आहेत, याकडे चंद्रकांत पाटील यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
राजकारणाचा स्तर खाली गेला, सगळ्यांनीच एकत्र बसून चर्चा केली पाहिजे
गेल्या 20 महिन्यात जे सुडबुद्धीने सुरू आहे. त्याची यादी करत आहे. ते कशात बसत आहे. महाराष्ट्रातील राजकीय जीवन सुसंस्कृत होतं. त्यावर काय चालू आहे. राज्यातील सर्व पक्षाच्या प्रमुखांनी एकत्रं बसून चर्चा केली पाहिजे, असं सांगतानाच मी राणेंच्या वाक्याचं समर्थन करत नाही. पण त्यांची शैली आहे. कोकणात ज्या पद्धतीने बोललं जातं तो अनादर नसतो, असं ते म्हणाले.
तसेच विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनीही नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेचा चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला. निलम गोऱ्हे विधानपरिषदेच्या उपसभापती असल्यामुळे त्यांना एका पक्षाची बाजू घेता येत नाही. मग त्या नारायण राणे यांच्यावर थेट टीका कशी करु शकतात. निलम गोऱ्हे यांनी गेल्या दोन-तीन महिन्यांत लिहलेले सर्व लेख आम्ही गोळा करत आहोत. त्यांची सगळी वक्तव्ये काढणार आहोत आणि न्यायालयात जाणार आहोत. निलम गोऱ्हे एका पक्षाची बाजू कशी घेऊ शकतात, हा सवाल आम्ही विचारणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
‘उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले, मग त्यांचं काय करायचं?’
केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यात येत नाही. पहिल्यांदाच तुम्हाला बातमी देतोय. देशाच्या शिष्टाचारानुसार क्रम सांगायचा तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती , पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांना कोणतंही राज्य सरकार अटक करू शकत नाही. या सरकारचं गेल्या 20 महिन्यात काय चाललंय? कोण यांना सल्लागार मिळाला माहीत नाही. कोर्टात ते प्रत्येक विषयावर फटके खात आहेत. तसं आता खातील, असं सांगतानाच शिवसैनिकांनी केस दाखल करणं समजू शकतो. पण अटक? मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते. तेव्हा पंढरपुरला मोदींना पंतप्रधान असताना चोर म्हणाले. त्याचं काय करायचं? मुख्यमंत्री असताना दसरा मेळाव्यात त्यांनी जे भाषण काढा. त्यावर किती केसेस दाखल करायच्या?, असा सवाल त्यांनी केला.
काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचे प्रकरण आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण, नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?
नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.
संबंधित बातम्या:
मग त्यावेळेस मुख्यमंत्र्यांवर गुन्हा का दाखल झाला नाही? राणे म्हणतात, मी क्रिमिनल ऑफेन्स केलाच नाही
Narayan Rane : मी नॉर्मल माणूस वाटलो काय? आमचं पण वरती सरकार, बघतोच : नारायण राणे
“कोंबडी चोर !!!” नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांचा संताप, दादरमध्ये डिवचणारे पोस्टर