आम्हाला परत घ्या, भाजपच्या डझनभर आमदारांचं ‘मविआ’पुढे लोटांगण?
पायावर धोंडा मारुन घेतल्याची भावना असलेले भाजपचे डझनभर आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचं वृत्त आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपच्या गोटात सहभागी झालेले, परंतु आता सत्तेबाहेर राहावे लागल्यामुळे पश्चाताप होत असलेले भाजप आमदार परतीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. एक-दोन नव्हे, तर भाजपचे डझनभर आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात (BJP MLA in Contact with MVA) असल्याचं वृत्त आहे.
विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजप सत्तेत असल्यामुळे आणि फडणवीस सरकार पुन्हा सत्तेत येईल, असं वातावरण भासल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे ढिगभर नेते आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये सहभागी झाले होते. परंतु, विधानसभा निवडणुकांनंतर सेना-भाजपचं अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरुन बिनसलं आणि फासे फिरले. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत महाविकास आघाडी स्थापन केली, आणि सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप अनपेक्षितपणे सत्तेबाहेर राहिला. त्यामुळे पायावर धोंडा मारुन घेतल्याची भावना असलेले बारा आमदार ‘महाविकास आघाडी’च्या संपर्कात असल्याचं ‘इकॉनॉमिक टाइम्स’ या वृत्तपत्राने सांगितलं आहे.
नाराज आपोआपच एकत्र येतात, खडसेंचे 10 रोखठोक मुद्दे
विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या एका खासदारानेही काँग्रेस-राष्ट्रवादीशी संपर्क केला असून वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. बारा आमदारांमध्ये प्रामुख्याने ‘आयारामां’चा भरणा आहे, जे आता ‘गयाराम’ होण्याच्या तयारीत आहेत. ‘आम्ही आमदारकीचा राजीनामा देऊन महाराष्ट्र विकास आघाडी’तील एखाद्या पक्षात सहभागी होतो आणि पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून रिंगणात उतरतो, असा प्रस्ताव या आमदारांनी ठेवला आहे. ही खेळी भाजपनेच महाराष्ट्रासह अन्य राज्यात खेळली होती, असंही या आमदारांचं म्हणणं आहे.
हिवाळी अधिवेशनानंतर आमदारांच्या माघारी फिरण्याला जोर येण्याची चिन्हं आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक पसंती राष्ट्रवादी पक्षाला आहे. तर काही जणांनी शिवसेना आणि काँग्रेसला पसंती दिली आहे. भाजपच्या तिकीटावर या आमदारांनी विजय मिळवला होता, परंतु आता काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित जोर लावला, तर मतांच्या बळावर आपण पुन्हा निवडून येऊ, असा विश्वासही त्यांनी (BJP MLA in Contact with MVA) व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले आमदार
बबनराव पाचपुते – राष्ट्रवादी ते भाजप – श्रीगोंदा, अहमदनगर राणा जगजितसिंह पाटील – राष्ट्रवादी ते भाजप – तुळजापूर, उस्मानाबाद नमिता मुंदडा – राष्ट्रवादी ते भाजप – केज, बीड
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आमदार
जयकुमार गोरे – काँग्रेस ते भाजप – माण, सातारा कालिदास कोळंबकर – काँग्रेस ते भाजप – वडाळा, मुंबई राधाकृष्ण विखे पाटील – काँग्रेस ते भाजप – शिर्डी, अहमदनगर नितेश राणे – काँग्रेस ते भाजप – कणकवली, सिंधुदुर्ग काशिराम पावरा – काँग्रेस ते भाजप – शिरपूर, धुळे रवीशेठ पाटील – काँग्रेस ते भाजप – पेण, रायगड
BJP MLA in Contact with MVA