शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना लायकी दाखवली, भाजपा आमदाराचे जिव्हारी लागणारे शब्द
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या परस्परविरोधी भूमिका आहेत. आज शरद पवार यांनी एक मत व्यक्त केलं. त्यामुळे भाजपाला उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेण्याची आयती संधी मिळाली.
विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. सर्वच पक्ष विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. मुख्यमंत्रीपदावरुन महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्षांच्या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी केली होती. आज शरद पवार यांनी या मुद्यावर वेगळं मत मांडलं. नेतृत्व कोणी करायचं हे निवडणूक झाल्यानंतर संख्याबळ ठरवून निर्णय घेऊ, असं शरद पवार म्हणाले. मविआमधील दोन प्रमुख नेत्यांच्या दोन परस्परविरोधी भूमिका असल्यामुळे भाजपाला आयत तोंडसुख घेण्याची संधी मिळाली आहे.
“शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना लायकी दाखवली. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपदाच दुकान कायमस्वरुपी बंद झालय. उद्धव ठाकरेंनी दिल्लीला जाऊन मुजरा केला, त्याचा काहीही उपयोग झाला नाही” अशी टीका कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली.
‘फक्त मुजरा करायचा बाकी राहिलेला’
“शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना त्यांची लायकी दाखवून दिली. मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत गेलेले. सगळे कार्यक्रम केले, फक्त मुजरा करायचा बाकी राहिलेला. महाविकास आघाडीत शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता अशी भूमिका घेत असेल, तर उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपदाच दुकान बंद झालय” अशी टीका नितेश राणे यांनी केली.