काँग्रेसचे माजी मंत्री कृपाशंकर सिंह भाजपच्या वाटेवर?
मुंबई : काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह हे भाजपमध्ये प्रवेश करणार का, या चर्चेला आता पुन्हा उधाण आलं आहे. याचे कारण भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी नुकतीच कृपाशंकर सिंह यांची ‘सदिच्छा भेट’ घेतली. आधीही कृपाशंकर सिंह भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या भेटीमुळे पुन्हा या चर्चंना उधाण आलं आहे. […]
मुंबई : काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह हे भाजपमध्ये प्रवेश करणार का, या चर्चेला आता पुन्हा उधाण आलं आहे. याचे कारण भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी नुकतीच कृपाशंकर सिंह यांची ‘सदिच्छा भेट’ घेतली. आधीही कृपाशंकर सिंह भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या भेटीमुळे पुन्हा या चर्चंना उधाण आलं आहे. कृपाशंकर सिंह हे काँग्रेसच्या सत्ताकाळात मंत्री होते.
राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते आणि आमदार भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यातच काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भाजपशी वाढलेली उघड जवळीक सर्वश्रुत आहे. त्यातच काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनीही गिरीश महाजन यांची भेट घेतली. आणि आता कृपाशंकर सिंह यांची भेट भाजप आमदार प्रसाद लाड यांनी घेतल्याने काँग्रेसमधील आणखी एक मोठा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
गेल्याच वर्षी गणेशोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या काळातही कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा राज्यात दारुण पराभव झाल्याने, पक्षात निराशेचे वातावरण आहे. त्यातच दोन ते तीन महिन्यात विधानसभा निवडणुका आल्या अशताना, अनेक नेत्यांना आपापल्या राजकीय भविष्याची चिंता वाटत आहे.
कोण आहेत कृपाशंकर सिंह?
कृपाशंकर सिंह हे काँग्रेसचे मुंबईतील वरिष्ठ नेते आहेत. उत्तर भारतीयांची मतं काँग्रेसकडे वळवण्यात कृपाशंकर सिंह यांचा वाटा मोलाचा मानला जातो. काँग्रेसच्या सत्ताकाळात 2004 साली कृपाशंकर सिंह हे राज्यमंत्री होते. 2009 साली विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं. त्याचे बहुतांश श्रेय कृपाशंकर सिंह यांना जातं, असं मानलं जातं. मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद, आमदार, राज्यमंत्री, अशी पदं काँग्रेसमध्ये कृपाशंकर सिंह यांनी भूषवली आहेत.