मुंबई : भाजप आमदार रमेश पाटील (Ramesh Patil) यांनी आज विधान परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केलंय. आमच्याकडे गुजरातहून निर्मा पावडर येतं. ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही स्वच्छ करून घेतो, असं वक्तव्य रमेश पाटील यांनी केलं आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विरोधकांकडून भाजपवर टीका केली जातेय. याच पक्षप्रवेशावर भाष्य करताना रमेश पाटील यांनी संबंधित वक्तव्य केलं. आमच्याकडे न्याय मिळतो म्हणून भूषण देसाई यांनी पक्षप्रवेश केला, असंही ते यावेळी म्हणाले.
विशेष म्हणजे इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांची भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे रात्री छान झोप लागते, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपच्या आणखी एका आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. याशिवाय भाजप नेत्यांकडून अशाप्रकारचे वक्तव्य वारंवार समोर येत असतात. कुणी ईडी चौकशीबद्दल खुलेआमपणे दावा करतो तर कुणी दुसरं काही म्हणतं. आता रमेश पाटील यांनी निरमा पावडरचा उल्लेख करत अनोख्या स्वच्छता मोहिमचा दाखल दिला आहे.
“तिथे काय केलं ते आम्हाला माहिती नाही. कुणीतरी सांगितलं की 400 कोटींच्या एमआयडीसीच्या प्लॉटची फाईल आहे म्हणून ते इथे आले आहेत. पण त्यासाठी ते इथे आलेले नाहीत. हे सरकार चांगलं काम करतंय आणि चांगला न्याय देतंय म्हणून ते इथे आले आहेत”, असा दावा रमेश पाटील यांनी केला. रमेश पाटील एवढंच बोलून थांबले नाहीत. त्यापुढेही ते बोलू लागले. “खरं म्हणजे आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे आणि ते गुजरातहून येतं. त्यामुळे आम्ही साफसफाई करुन जो माणूस आमच्याकडे जो माणूस येईल तो माणूस स्वच्छ होणार आहे”, असं रमेश पाटील म्हणाले.
महाराष्ट्र आणि देशभरातील अनेक नेत्यांविरोधात ईडी आणि सीबीआयची कारवाई करण्यात आली. यातील सर्वाधिक नेते हे विरोधी पक्षातील होते. विशेष म्हणजे अनेक नेत्यांना जेलमध्ये जावं लागलं. या दरम्यान ज्या नेत्यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे त्यातील अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश झाला. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या अनेक नेत्यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लागलेला. पण त्यांनी आता भाजपसोबत हातमिळवणी केलीय. त्यामुळे त्यांच्यावर आता कारवाई होणार नाही का? असा सवाल विरोधकांकडून केला जातो.