राज ठाकरे, शरद पवार, फडणवीस, अजितदादांनंतर आता तुझा नंबर; भाजप आमदाराला आलेल्या धमकीच्या पत्रात नेमकं काय म्हटलं?
तुम्ही आमच्यासारख्या विषारी सापांच्या शेपटीवर पाय ठेवला आहे. आता आमची मुले गप्प बसणार नाहीत. घराघरात कसाब, अफजल गुरू, याकूब आणि युसूफ जन्माला येतील याची याद राखा.
सोलापूर: सोलापूर शहर उत्तरचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख (vijaykumar deshmukh) यांना पीएफआय (PFI) या केंद्र सरकारने बंदी घातलेल्या संघटनेने धमकी दिली आहे. देशमुख यांना त्यांचे मुंडके धडा वेगळे करण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच या पत्रात केंद्रातील आणि राज्यातील काही नेत्यांची नावेही घेण्यात आली आहेत. हे नेते पीएफआयच्या रडारवर असल्याचं या धमकीच्या पत्रातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस (police) अधिक तपास करत आहेत.
सोलापूरच्या मोहम्मद शफी बिराजदार नावाच्या पीएफआयच्या कार्यकर्त्याने हे धमकीचं पत्रं आमदार विजयकुमार देशमुख यांना पाठवलं आहे. स्वहस्ते लिखित हे पत्रं आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सुशीलकुमार शिंदे, योगी आदित्यनाथ, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि अजित पवार आमच्या ब्लॅकलिस्टमध्ये आहेत. त्यांच्यानंतर आता तुझा नंबर आहे, अशी धमकीच या पत्रातून देण्यात आली आहे.
तुम्ही आमच्यासारख्या विषारी सापांच्या शेपटीवर पाय ठेवला आहे. आता आमची मुले गप्प बसणार नाहीत. घराघरात कसाब, अफजल गुरू, याकूब आणि युसूफ जन्माला येतील याची याद राखा, असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे.
तुम्ही लोकांनी आमच्या पीएफआय संघटनेवर बंदी घालून चूक केली आहे. तुम्हाला या चुकीचे परिणाम भोगावेच लागतील. यापूर्वी तुम्ही सिमीवर बंदी घातली होती. काय झालं त्याचं? ही बंदी फोल ठरली आहे. तुम्ही पीएफआयवर लाख वेळा बंदी घाला. काही फरक पडणार नाही. आम्ही फिनिक्सप्रमाणे पुन्हा उभारी घेऊ, असा इशाराही देण्यात आला आहे.
तुझे मुंडके धडापासून वेगळे करणार आहोत. ही धमकी नाही डायरेक्ट ॲक्शन प्लॅन आहे. एवढेच काय अयोध्या, काशी, मथुरेत आमचे सुसाईड बॉम्बर एका दिवसात खळबळ उडवून देऊन दहशत निर्माण करतील. आम्ही मुसलमान आहोत, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, या पत्रानंतर देशमुख यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली. पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्याकडे त्यांनी तक्रार दिली असून माने यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.