भाजपच्या 105 आमदार अन् खासदारांनी राजीनामा द्यावा; निलम गोऱ्हे असं का म्हणाल्या?
देशभरात विरोधकांना अडचणीत आणलं जात आहे. उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही ते म्हणाले.
रवी लव्हेकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पंढरपूर: शिवसेनेच्या (shiv sena) नेत्या निलम गोऱ्हे यांनी सत्तेत आलेल्या भाजपला चांगलेच डिवचले आहे. भाजपच्या (bjp) 105 आमदारांनी कधी कार्य अहवाल सादर केला का? हे काही कामच करत नाहीत. केंद्र सरकारने खासदारांचा निधी स्वतःकडे वळवला. जनतेला काहीच कळू देत नाहीत. भाजपचे दाबवाचे राजकारण सुरू आहे. पंढरपूरचा प्रास्तविक विकास आराखडा जनतेला माहिती नाही. त्यामुळे स्थानिक भयभीत आहेत. पंढरपूर विकास आराखड्या मागे सूत्रधार कोण? हे पुढे आले पाहिजे, असं सांगतानाच आम्ही भाजपचे वेठबिगारी नाहीत. आमच्या मतावर भाजपचे 105 आमदार आणि खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा राजीनामा द्या, अशी मागणी निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केली आहे.
निलम गोऱ्हे या पंढपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला असता ही मागणी केली. आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं नाही हे उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीनंतर भाजपला स्पष्ट सांगितलं होतं.सोबत काम करायचं नाही म्हणजे खंजीर खुपसला असे होत नाही. भाजपने स्वबळावर सत्ता स्थापनेची तयारी केली होती. स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी अनेक आयरामांना पक्षात घेतले, असा दावा निलम गोऱ्हे यांनी केला आहे. सरकारला सुबुद्धी देण्यासाठी शिवसेनेचे दार उघड बये अभियान करण्यात येत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दसरा मेळाव्यासाठी शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीची मदत घेणार हा जावई शोध आहे. आमदार राम कदम हरिश्चंद्र आहेत का? राम कदमांची टीका म्हणजे धुराळा चित्रपटासारखी आहे. कदमांनी मदतीचे पुरावे द्यावे , यांची तुलना पशुसोबत देखील होऊ शकत नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. रामदास कदमांच्या बोलण्याचा तपास करण्यासाठी सत्य शोधन समिती स्थापन करणे गरजेचे असा टोलाही त्यांनी लगावला.
देशभरात विरोधकांना अडचणीत आणलं जात आहे. उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या विधानावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आपली श्रध्दा अढळ आहे तर कुणाच्या विधानाकडे का लक्ष द्यायचं? भुजबळांनी महिला देवाबद्दल बोलणे चुकीचे आहे, असं त्या म्हणाल्या.
आमचा प्लॅन एकचं लोकांसोबत जाणे हा आहे. ईश्वराबरोबर न्याय देवता आम्हाला न्याय देईल. बाजारबुणगे आणि शिवसैनिक यामध्ये फरक आहे, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.