मुंबई: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात काहीशा अनपेक्षितरित्या मंत्रिपदी वर्णी लागलेले खासदार कपिल पाटील सध्या चांगलेच चर्चेत आहेत. मंत्रिपद मिळाल्यानंतर कपिल पाटील जन आशीर्वाद यात्रेसाठी महाराष्ट्रात आले आहेत. त्यामुळे आगामी काही दिवस कपिल पाटील हे प्रकाशझोतात राहणार आहेत.
अवघ्या सात वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कपिल पाटील यांनी केंद्रात राज्यमंत्रीपद मिळवून कमी वेळात खूप मोठी मजल मारल्याचे बोलले जाते. आगामी काळात भाजपकडून त्यांना आगरी समाजाचा नेता म्हणून प्रोजेक्ट करण्याचा मानस आहे. त्यामुळे आगामी काळात कपिल पाटील यांचे भाजपमधील स्थान आणखीनच बळकट होणार आहे.
कपिल पाटील यांचा जन्म 5 मार्च 1961 रोजी ठाणे जिल्ह्यातील दिवे अंजुर या गावात झाला. कपिल पाटील यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळात ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद भुषविले. तसेच काही काळ ते ठाणे जिल्हा परिषदेचे सभापतीही होते.
कपिल पाटील यांनी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर गावचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भुषवलं. पुढे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 व 2019 मधील भिवंडी लोकसभा मतदार संघातून दणदणीत विजयही त्यांनी संपादित केला. दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय कामाची चांगली ओळख असल्याने त्यांनी अल्पावधीतच भाजपामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
2014 सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या खासदारांचा आकडा वाढवण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी अगदी शेवटच्या क्षणाला कपिल पाटील यांना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आणले होते. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांना गळाला लावून शरद पवार यांना शह दिला होता.
कपिल पाटील हे सक्रीय राजकारणात होते तरी कधी त्यांनी विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत याआधी विजय मिळवला नव्हता. तरीही गोपीनाथ मुंडे यांनी हा धोका पत्कारत कपिल पाटील यांना खासदारकीचं तिकीट मिळवून दिलं. मोदी लाटेमुळे पहिल्याच फटक्यात कपिल पाटील विजयी झाले होते.
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप यांच्यात झालेल्या फारकतीमुळे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे प्राबल्य कमी करण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींकडून कपिल पाटील यांना संधी देण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकीत पाटील यांना राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय व आर्थिक सामना करावा लागेल. पाटील हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. ठाणे शहरात व अन्य काही शहरात भाजपकडे आश्वासक चेहरा नाही. पाटील यांच्या रुपाने ती गरज पूर्ण होईल, असं बोललं जात आहे.
संबंधित बातम्या: