Navneet Rana| उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, असता तर घरी बसले नसते, नवनीत राणांची खोचक टीका
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी संभाजी ब्रिगेडशी युती करत असल्याची घोषणा केली.
मुंबईः उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) कुणाशीही युती केली तरी ते यशस्वी होणार नाही. त्यांच्यामध्ये दम नाही. तसं असतं तर ते घरी बसले नव्हते, अशी खोचक टीका भाजप खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजातील संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) या संघटनेशी राजकीय युती केल्याची आज घोषणा केली. त्यावर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा एका कोर्टाच्या खटल्यासंबंधी मुंबईत आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्राच्या राजकारणात आज संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना या दरम्यानची युतीची मोठी घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भाजपच्या प्रभावाखाली येणाऱ्या मराठा व्होट बँकेला लक्ष्य करण्यासाठी शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडशी युती केली आहे. मात्र हिंदुत्वविरोधी संघटनेशी बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाने युती केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
शिवसेना-संभाजी ब्रिगेड युती
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी संभाजी ब्रिगेडशी युती करत असल्याची घोषणा केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचीही घोषणा करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे उपस्थित होते.
मनसेची काय प्रतिक्रिया?
मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेना-संभाजी ब्रिगेडच्या युतीवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुत्वविरोधी, जातीयवादाचं विष पेरणाऱ्या संभाजी ब्रिगेडसोबत शिवसेनेची युती स्व. बाळासाहेब ठाकरे यांना तरी अपेक्षित होती का, असा सवाल त्यांनी केलाय. संभाजी ब्रिगेड ही राष्ट्रावादी काँग्रेसची बी टीम आहे तर उद्धव ठाकरेंची सेना ही राष्ट्रवादी काँग्रेसची ड टीम आहे. महाविकास आघाडीशी युती केल्यामुळे आमदार, खासदार नाराज झाले. ते उद्धव ठाकरेंना सोडून निघून गेले. आता संभाजी ब्रिगेडशी युती केल्यानंतर सामान्य शिवसैनिक अस्वस्थ असून तोदेखील उद्धव ठाकरेंना साथ देणार नाही, अशी प्रतिक्रिया गजानन काळे यांनी व्यक्त केली.
गिरीश महाजानांचाही टोला….
काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेलेल्या शिवसेनेची राजकीय आत्महत्या झाली आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडसोबत जाण्याने काही फरक पडत नाही. उद्धवजींनी आता फक्त एमआयएमसोबत जाणं बाकी आहे, मतं मागायसाठी विनवण्या करणं, मांडीला मांडी लावून बसलं, हात वर करून सोनियाजींची शपथ घेऊन, आम्ही वेगळं होणार नाही… हे सांगणं.. हे बरोबर नाही. काँग्रस राष्ट्रवादी सोबत जाताना एक सुसाईड बॉम्ब लावला होता. आता त्यांची राजकीय आत्महत्या झाली आहे, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय.