मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे घराण्याचे स्थान हे अत्यंत महत्वाचे आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या राजकारणाचा वारसा पंकजा आणि प्रीतम (Pritam Munde) या त्यांच्या दोन्ही मुलींनी पुढे नेला. यापैकी गोपीनाथरावांच्या उत्तराधिकारी असलेल्या पंकजा मुंडे या सातत्याने चर्चेत असतात. अलीकडच्या काळात मुंडे भगिनी भाजपमधील आपले स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. या संपूर्ण प्रवासात प्रीतम मुंडे या पंकजांच्या पाठिशी ठामपणे उभ्या आहेत.
पंकजा मुंडेंच्या तुलनेत प्रीतम या राजकारणात बऱ्याच उशीरा आल्या. मात्र, गेल्या सहा वर्षांच्या खासदारकीच्या टर्ममध्ये प्रीतम मुंडे यांनी बऱ्यापैकी आपले बस्तान बसवले आहे. पंकजा मुंडे यांच्या छायेत प्रीतम मुंडे या काहीशा झाकोळल्या जात असल्या तरी आपल्या बहिणीला साथ देण्याची भूमिका त्या अत्यंत चोखपणे बजावत आहेत.
प्रीतम मुंडे यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1983 रोजी झाला. प्रीतम मुंडे यांनी 2005 साली डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी घेतली. त्यानंतर 2010 पर्यंत प्रीतम मुंडे यांनी एम.डी. चे शिक्षण पूर्ण केले. त्या पेशाने त्वचारोग तज्ज्ञ होत्या. 2009 मध्ये प्रीतम मुंडे यांचा विवाह नाशिकच्या गौरव खाडे यांच्याशी झाला. या दाम्पत्याला एक मुलगा आहे.
2014 साली गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांनी काँग्रेस नेते अशोक पाटील यांचा तब्बल 7 लाख मतांनी पराभव करत लोकसभेत प्रवेश केला. तर 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनावणे यांना पराभवाची धूळ चारली होती.
मध्यंतरी प्रीतम मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये पंकजा यांनी प्रीतमला आपली सावली म्हटले होते. मुंडे भगिनींचा गेल्या काही वर्षातील राजकीय प्रवास पाहता हे विधान तंतोतंत खरे ठरते.
लहान माझी बाहुली तिची मोठी सावली…इतकी एकरूप की जणू सावली… वाढदिवसाचे खूप आशिर्वाद प्रीतम तू नेहमी सुखी रहा..@DrPritamMunde pic.twitter.com/RRpQiJnAiH
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 17, 2021
नुकत्या झालेल्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी महाराष्ट्रातून प्रीतम मुंडे यांचे नाव आघाडीवर होते. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळणारच, अशी अटकळ बहुतेकांनी बांधली होती. मात्र, शेवटच्या क्षणी चक्रे फिरली आणि मंत्रिपदाची माळ पंकजा मुंडे समर्थक असलेल्या डॉ. भागवतराव कराड यांच्या गळ्यात पडली होती. त्यानंतर मुंडे भगिनी पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. यावर पंकजा यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, भाजपमध्ये मुंडे भगिनींची होणारी घुसमट पाहता पंकजा आणि प्रीतम मुंडे आगामी काळात वेगळी राजकीय वाट चोखाळण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.