BJP MVA: भाजपचे ‘सेंट्रल’ हल्ले ठाकरे सरकारच्या पथ्यावर? जेवढे जास्त हल्ले तेवढी आघाडी मजबूत होतेय? समजून घ्या 5 मुद्यांच्या आधारे
केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडसत्रामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार नाही, उलट अधिक घट्ट होईल असा दावा आता महाविकास आघाडीतील नेते करताना पाहायला मिळतात.
मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचं (Central Investigation Agency) धाडसत्रही सुरु झालं. महाविकास आघाडीतील अनेक नेते, मंत्री, आमदार आणि खासदारांवर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडी, तसंच आयकर विभागाच्या धाडी सुरुच आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कुटुंबीयांवरही धाडी सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी या धाडसत्रामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार नाही, उलट अधिक घट्ट होईल असा दावा आता महाविकास आघाडीतील नेते करताना पाहायला मिळतात. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही अनेकदा तसा दावा केलाय.
- काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत याबाबत महत्वाचं वक्तव्य केलंय. काही प्रमाणात महाविकास आघाडीतील घटकपक्षांचं हे बंधन पूर्वीपेक्षाही अधिक मजबूत झालं आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये चांगला समन्वय आहे. तिनही पक्षांचे नेते एकमेकांना पाठिंबा देत असतात. मला सध्या तरी महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद दिसत नाहीत.
- सध्या महाविकास आघाडीतील या मजबूत बंधाचे श्रेय भाजपच्या सततच्या हल्ल्यांना आहे. भाजप जेवढं आम्हाला लक्ष्य करेल तेवढी महाविकास आघाडी अधिक घट्ट होईल, असंही निरुमप म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना भाजपनं लक्ष्य केलं. शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्स प्रकरणात गोवण्याचा आणि शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपनं केला. भाजपच्या या हल्ल्यांमुळे आम्हाला जवळ येण्यास मदतच झाली. आम्हाला एकमेकांबद्दल सहानुभूती आहे. आपल्या शेजाऱ्यावर कुणी बाहेरचा व्यक्ती हल्ला करत असेल तर शेजाऱ्याबाबद सहानुभूती वाटणे स्वाभाविक आहे. हा मानवी स्वभाव असल्याचंही निरुमप यांनी म्हटलंय.
- महाविकास आघाडीबाबत बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीत काही मतभेद असू शकतात. मात्र केंद्र सरकारकडून सातत्याने सुरु असलेल्या हल्ल्यामुळे सरकार अधिक मजबूत बनले आहे. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्षांना अधिक जवळ आणल्याचंही राऊत यांनी म्हटलंय.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पवार आणि ठाकरे कुटुंबातील नात्याबद्दल भाष्य केलं. सुळे यांनी ठाकरे कुटुंबाची पाठराखण करत पवार कुटुंब त्यांच्यामागे भक्कमपणे उभं असल्याचं म्हटलंय. ठाकरे आणि पवार कुटुंबाचं नातं 55 वर्ष जुनं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे घट्ट मित्र होते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
- सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अन्य भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. केंद्रीय तपास यंत्रणांच्या छापेमारीचा महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेवर कुछलाही परिणाम होणार नसल्याचंही त्या म्हणाल्या.
इतर बातम्या :