नारायण राणे, पीयूष गोयल आता लोकसभेच्या मैदानात, मागचे दार बंद ?
भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या कोट्यातील तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. या नावांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा समावेश नाही. यामुळे भाजप नारायण राणे यांना कोकणातून लोकसभेच्या मैदानात उतरवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवी दिल्ली, दि. 14 फेब्रुवारी 2024 | लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभेच्या 56 जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. देशातील 15 राज्यांतील 56 जागांवर ही निवडणूक होणार आहे. ही निवडणूक 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तसेच 29 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. आता भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या कोट्यातील तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. या नावांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा समावेश नाही. यामुळे भाजप नारायण राणे यांना कोकणातून लोकसभेच्या मैदानात उतरवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रकाश जावडेकर यांना उमेदवार दिलेली नाही. त्यांना पुन्हा पक्ष संघटनेत पाठवण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये दोन दिवसांपूर्वी दाखल झालेले अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.
या सदस्यांना मागणी दारे बंद
विद्यमान राज्यसभा सदस्यांसाठी भाजपाने ‘मागचे दरवाजे’ बंद केल्याची चर्चा आहे. त्यामुळे पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, नारायण राणे, भागवत कराड, विनय सहस्त्रबुद्धे यांना आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. राज्यातून विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. परंतु या तिघांपैकी कोणाचे नाव आले नाही.
राणे, गोयलसाठी हा मतदार संघ
भाजप आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तसेच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल. भाजपने राज्यसभेसाठी आपल्या तीन उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले नेते अशोक चव्हाण, भाजपच्या पुणे येथील माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांचा समावेश आहे.
भाजप सहावी जागा लढवणार का?
भाजपने आपले तीन उमेदवार जाहीर केले आहे. एक जागा राष्ट्रवादीला तर एक जागा शिवसेनेला दिली जाणार आहे. पाच जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येऊ शकतात. परंतु सहावी जागा आणण्यासाठी महाविकास आघाडीची मते भाजपला फोडावी लागणार आहे. यामुळे भाजप सहावी जागा लढवणार का? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.