पोटनिवडणुकांमध्ये भाजपला धक्का, दिल्लीत आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; मोदी-शहा आखणार नवी रणनीती
पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या हिमाचल प्रदेशात भाजपला धक्कादायक निकालांना सामोरे जावे लागले होते. अन्य राज्यांमध्येही भाजपला अपेक्षित यश मिळाले नव्हते. त्यामुळे आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. | BJP National Executive meet
नवी दिल्ली: देशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. नुकत्याच झालेल्या 13 राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये संमिश्र कल पाहायला मिळाला होता. मात्र, पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या हिमाचल प्रदेशात भाजपला धक्कादायक निकालांना सामोरे जावे लागले होते. अन्य राज्यांमध्येही भाजपला अपेक्षित यश मिळाले नव्हते. त्यामुळे आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मतदारांचा बदलता कल लक्षात घेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जोडगोळी कोणती नवी रणनीती आखणार, हे पाहावे लागेल.
या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित असतील. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल यांच्यासह अनेक नेते या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. तर राज्यस्तरावरील भाजप नेते या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती लावतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना दिल्लीला बोलावण्यात आलेले नाही. सकाळी साधारण साडेनऊच्या सुमारास ही बैठक सुरु होईल.
बैठकीला कोण उपस्थित राहणार?
या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे सुमारे 300 नेते उपस्थित राहणार आहेत. सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष, संघटना मंत्री आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकत्रितपणे पक्षाच्या प्रदेश कार्यालयाशी संपर्क साधणार आहेत. एकूणच संमेलनाचे स्वरूप ऑनलाइन आणि ऑफलाइन असे असणार आहे.
पोटनिवडणुकांमध्ये काय झाले?
13 राज्यांतील पोटनिवडणुकांमधील कल संमिश्र असला तरी तो भाजपच्या आतापर्यंतच्या घोडदौडीला साजेसा नव्हता. महाराष्ट्रातील देगलूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुभाष साबणे यांना काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर दादरा-नगर हवेलीमध्येही शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने धूळ चारली होती.
राजस्थानच्या वल्लभ नगर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हिम्मत सिंह चौथ्या क्रमांकावर फेकले गेले होते. अपक्ष उमेदवारांनीही त्यांच्यापेक्षा जास्त मते मिळवली होती. तर हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला सर्वात मोठा धक्का बसला होता. याठिकाणी मंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला होता. हा मतदारसंघ भाजपचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा बालेकिल्ला मानला जातो. तर राज्यातील तीन विधानसभा पोटनिवडणुकांमध्येही भाजपचे उमेदवार पराभूत झाले होते.
संबंधित बातम्या: