48 तासांचं अल्टिमेटम, शरद पवार सीमाभागात जाणार होते, त्याचं काय झालं? भाजप नेत्याने डिवचलं
48 तासांच्या अल्टिमेटमचं काय झालं, असा खोचक सवाल शरद पवार यांना विचारण्यात आलाय.
मुंबईः 48 तासाचं अल्टिमेटम देतोय. कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायावर मार्ग काढला नाही तर मी स्वतः बेळगावात जाईन, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारला दोन दिवसांपूर्वी शऱद पवार (Sharad Pawar) यांनी हा इशारा दिला होता, त्याचं काय झालं, असा सवाल करत भाजप नेत्याने डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक प्रश्न चिघळला असून केंद्र सरकार किंवा महाराष्ट्रातील भाजप यावर काय भूमिका घेते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यातच भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शरद पवार यांना असा प्रश्न विचारलाय.
निलेश राणे यांनी आज एका ट्विटद्वारे शरद पवारांना हा प्रश्न विचारलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागंलय.
बेळगाव येथील सीमावासिय प्रचंड दहशतीत आहेत. महाराष्ट्र सरकारकडून त्यांना सहकार्याची अपेक्षा आहे. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री वारंवार चिथावणीखोर वक्तव्ये करत आहेत.
ते पवार साहेब 48 तास थांबून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात जाणार होते त्याचं काय झालं??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 9, 2022
त्यामुळे केंद्र सरकारने यात लवकरात लवकर हस्तक्षेप करावा. महाराष्ट्र सरकारने काही केलं नाही तर परिस्थिती आणखी चिघळेल. यासाठी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल, असा इशारा शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत दिला होता.
तोच धागा पकडत निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 48 तासांच्या अल्टिमेटमचं काय झालं, असा सवाल यांनी केला आहे.
6 डिसेंबर रोजी मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील हे बेळगावात जाणार होते. मात्र कर्नाटक सरकारच्या इशाऱ्यानंतर त्यांचा हा दौराही रद्द झाला.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते. मात्र या बैठकीतही सीमाप्रश्नावर बोलणं झालं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.