महापालिका निवडणूकीच्या तोंडावर भाजपच ‘मराठी दांडिया’ कार्ड; शिवसेनेची डोकेदुखी वाढणार?
माझे सर्वपक्षीय संबंध चांगले आहेत. आम्हाला कोणता पक्ष नसतो. आम्हाला जिथे सादरीकरण करायला मिळतील तिथं आम्ही करू, असं गुप्ते यांनी स्पष्ट केलं.
विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: आधी वरळीच्या जांबोरी मैदानावर दहीहंडीचं आयोजन करून भाजपने (bjp) मराठी माणसाला साद घालत शिवसेनेची (shivsena) कोंडी केली. आता ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मराठी दांडियाचं (marathi dandiya) कार्ड खेळण्याचा निर्णय घेतला आहे. गुजराती दांडियापाठोपाठ भाजपने अभ्यूदय नगरच्या मैदानात मराठी दांडियाचं आयोजन केलं आहे. नऊ दिवस या मैदानात हा महोत्सव पार पडणार असून या महोत्सवात राजकारणी आणि सेलिब्रिटी भाग घेणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी माणसाला साद घालण्यासाठीच भाजपने हे आयोजन केल्याचं सांगितलं जात असून भाजपच्या या मराठी दांडियाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपचे आमदार मिहीर कोटेचा आणि गायक अवधूत गुप्ते यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. गेल्या अडीच वर्षात हिंदू सण दाबले गेले होते. मात्र, आपलं सरकार आल्यापासून आता उत्सव दणक्यात साजरे होत आहेत. दहीहंडी, गणेशोत्सवानंतर आता नवरात्र उत्सव जोरदार साजरा करणार आहोत. आम्ही मुंबईतील अभ्यूदय नगरच्या मैदानात नवरात्र साजरा करणार आहोत. मुंबईतील सर्वात मोठा उत्सव साजरा झाला पाहिजे हाच आमचा प्रयत्न असणार आहे, असं मिहीर कोटेचा यांनी सांगितलं.
30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. आम्हाला आशा आहे की शेवटच्या 2 दिवसात सरकार हा उत्सव 12 पर्यंत साजरा करण्याची परवानगी देईल. 1 ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाला वैशाली सामंत तसेच अनेक कलाकार उपस्थित राहतील. प्रत्येक व्यक्तीला पास घेऊन प्रवेश मिळणार आहे. आम्ही 3 ठिकाणांचा विचार केला होता. जांबोरी मैदान, रेसकोर्स आणि अभ्यूदय नगर. पण रेसकोर्सवर चिखल आहे. जांबोरी मैदानावर देवी असते म्हणून अभ्यूदय नगरला आम्ही दांडिया उत्सव करणार आहोत, असं ते म्हणाले.
मोठा दांडिया व्हावा असं आम्हाला वाटतं होत म्हणून अवधूत गुप्ते यांच्यासह आम्ही दांडियाचे आयोजन केले आहे. आशा आहे की या उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असं भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या.
मराठी दांडियाचं आयोजन होतंय याचा मला खूप आनंद आहे. मला सलग गायला मिळणार आहे, याचा खूप आनंद आहे. याबदल मी भाजपचे खूप आभारी आहे. सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात मी जे गायलो तेच या कार्यक्रमात गाणार आहे. यात मराठी, हिंदी आणि गुजराती गाणी असतील. काय कार्यक्रमात हिंदी गाणी गायली जातील. पण मराठी गाण्यांना सर्वाधिक प्राधान्य असेल, असं अवधूत गुप्ते म्हणाले.
माझे सर्वपक्षीय संबंध चांगले आहेत. आम्हाला कोणता पक्ष नसतो. आम्हाला जिथे सादरीकरण करायला मिळतील तिथं आम्ही करू, असं गुप्ते यांनी स्पष्ट केलं. नि:शुल्क पासेसद्वारे मराठी दांडियाकरता प्रवेश मिळणार आहे. दररोज 14 ते 15 हजार लोक मराठी दांडियात सहभागी होणार असल्याचं सांगितलं जातं.