उत्तरेच्या राजकारणात नवे वारे, वरुण गांधी भाजपाला कंटाळले, काँग्रेसची वाट धरणार?
Varun Gandhi News | गांधी घराण्यातील असूनही वरुण गांधी आणि राहुल गांधी यांच्या विचारसरणीत मोठा फरक आहे. मात्र गेल्या काही वर्षांत वरुण गांधींची भाषा बदलतेय.
नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) पीलीभीत येथील भाजप खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) अनेक वर्षांपासून भाजपात नाराज आहेत. त्यांनी एकानंतर एक अनेक वक्तव्य भाजपाविरोधी केली आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा त्यांना उमेदवारी देईल की नाही, याची शंकाच आहे. त्यामुळे वरुण गांधीदेखील कोणत्याही क्षणी भाजपाला सोडचिट्ठी देण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेयो. भाजपातून बाहेर पडले तरी वरुण गांधी काँग्रेसमध्ये (Congress) जाणार की इतर पक्षाची वाट धरणार, यावरून आता अंदाज बांधले जात आहेत.
भारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांनी अनेकदा हिंदु-मुस्लिमांवरून माध्यमांवर निशाणा साधला. वरुण गांधी यांनीदेखील मागील महिन्यात एक भाषण केलं. यावेळी त्यांनी हिंदु-मुस्लिम मुद्द्याचा उल्लेख करत माध्यमांवर टीका केली.
तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी नुकतंच वरुण गांधी एक पत्र लिहिलं. दुर्धर आजार ग्रस्त रुग्णांसाठी केंद्र सरकारच्या योजना आणि घोषणा जनतेपर्यंत पोहोचवल्या जाव्यात असा सल्ला त्यात देण्यात आला. वरुण गांधी यांच्या गेल्या काही दिवसांतील वक्तव्यातून ते भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत, असं दिसतंय.
काँग्रेसमध्ये जाणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुण गांधी आणि त्यांची चुलत बहीण प्रियंका गांधी यांच्यादरम्यान नेहमी बोलणं होत असतं. यात कौटुंबिक मुद्द्यांचा समावेश असतोच. पण हल्ली राजकारणावरही ते एकमेकांशी बोलत असतात, असं म्हटलं जातंय.
वरुण गांधींनी भाजपाला सोडचिट्ठी दिली तर त्यांच्याकडे अनेक मार्ग आहेत. सपा, आरएलडी, बसपा असे अनेक. पण या प्रादेशिक पक्षांऐवजी वरुण गांधी काँग्रेसलाच प्राधान्य देण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
काँग्रेसला फायदा होणार?
गांधी घराण्यातील असूनही वरुण आणि त्यांचे चुलत बंधू राहूल गांधी यांची विचारसरणी वेगळी आहे. पण गेल्या काही दिवसांत वरुण गांधींची भाषा बदलली आहे, असं म्हटलं जातंय. ते भाजपाविरोधी बोलतात. पण काँग्रेस तसेच पंडित नेहरुंविरोधी बोलत नाहीत.
देश तोडण्याचं नव्हे तर देश जोडण्याचं राजकारण झालं पाहिजे, असं वक्तव्य करत आहेत. त्यामुळे आगामी काळात ते काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्याचे ते प्रतिनिधीत्व करतात. पंतप्रधान बनण्याचा मार्ग येथूनच जातो. त्यामुळे इथे काँग्रेस वरुण गांधींचा चांगलाच वापर करू शकते.
एक तरुण नेतृत्व म्हणून काँग्रेस वरुण गांधींचा चांगला उपयोग करू शकते.
उत्तर भारतात मोठा चेहरा
वरुण गांधी हे काँग्रेसचे दिवंगत नेते संजय गांधी आणि त्यांच्या भाजपमधील पत्नी मनेका गांधी यांचे चिरंजीव आहेत.
तज्ज्ञांच्या मते, वरुण गांधींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर ते उत्तर भारताची धुरा सांभाळू शकतात तर राहुल गांधी दक्षिणेतील राज्यांची जबाबदारी पेलू शकतात. उत्तरेकडे वरुण गांधी आणि प्रियंका गांधी यांची जोडी चांगली भूमिका बजावू शकतील.
उत्तर भारतात वरुण गांधी लोकप्रिय आहेत. फक्त ते भाजपाविरोधी मोठा निर्णय कधी घेतात की भाजपात राहूनच सरकारवर टीका सुरु ठेवतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.