‘महाराष्ट्र सरकारला लुटारुंचं ग्रहण’ परमबीर सिंहांच्या लेटर बॉम्बनंतर भाजपची पोस्टरबाजी
भाजपतर्फे खारघर, कळंबोली, कामोठे, कर्जत, खोपोली, खालापूर आणि पनवेल येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. (BJP Protest against Anil Deshmukh )
पनवेल : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी दरमहा 100 कोटी रुपये खंडणी वसुलीचे टार्गेट गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिन वाझेंना (Sachin Vaze) दिल्याचा गौप्यस्फोट पत्राद्वारे केल्यानंतर संपूर्ण राज्यभर हे प्रकरण गाजत आहे. पनवेल भाजपने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. खारघरमध्ये भाजपने निदर्शनं करत देशमुखांचा निषेध नोंदवला. ‘महाराष्ट्र सरकारला लुटारुंचं ग्रहण’ असं लिहिलेल्या बॅनरवर अनिल देशमुखांचा फोटो लावून भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. (BJP Protest against Home Minister Anil Deshmukh after Param Bir Singh allegations)
‘महाराष्ट्र सरकारला लुटारुंचं ग्रहण’
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, जर स्वतः त्यांनी राजीनामा दिला नाही तर गृहमंत्री पदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात यावी यासाठी भाजपतर्फे खारघर, कळंबोली, कामोठे, कर्जत, खोपोली, खालापूर आणि पनवेल येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. ‘महाराष्ट्र सरकारला लुटारुंचं ग्रहण’ असं लिहिलेला बॅनर हाती धरुन भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. या बॅनरवर अनिल देशमुख यांचे छायाचित्र आहे. पनवेलमध्ये कामोठे भागातही अशाच प्रकाराचे निदर्शन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
खारघरमध्ये काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील, नगरसेवक रामजी बेरा गेला, दीपक शिंदे, किरण पाटील, वासुदेव पाटील आदींसह भाजपचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
काय आहे प्रकरण?
मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग (Prambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. परमबीर सिंग यांनी एसीपी पाटील नावाच्या पोलीस अधिकाऱ्यासोबत झालेला संवाद थेट या पत्रात दिला आहे. तारीख आणि वेळेसहित हा संवाद असल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
संबंधित बातम्या :
दिल्लीत ‘काका मला वाचवा’ असा आवाज घुमत होता; भाजपचा राष्ट्रवादीला सॉल्लिड टोला
IPS ज्युलियो रिबेरोंनी शरद पवारांचा प्रस्ताव नाकारला; लेटरबॉम्बचा तपास करण्यास नकार
(BJP Protest against Home Minister Anil Deshmukh after Param Bir Singh allegations)